Tue, Nov 20, 2018 16:55होमपेज › Solapur › सोलापूर : मोहोळमध्ये पतसंस्‍थेला २१ लाखाचा गंडा घालणार्‍याला अटक

सोलापूर : मोहोळमध्ये पतसंस्‍थेला २१ लाखाचा गंडा घालणार्‍याला अटक

Published On: Jul 27 2018 8:15PM | Last Updated: Jul 27 2018 8:15PMमोहोळ : वार्ताहर

मोहोळ येथील सद्गुरू पतसंस्थेत माजी कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन पतसंस्थेला गंडवणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. संजय विलास पडवळकर (रा. देशमुख गल्ली, मोहोळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी २७ जुलै रोजी त्यास मोहोळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सद्गुरु पतसंस्था अपहार प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोहोळ येथील संजय विलास पडवळकर यांनी सद्गुरु सहकारी पतसंस्था मोहोळ यांच्याकडून २१ लाख २२ हजार ४०६ रुपयांचे कर्ज घेतले होते. यानंतर पतसंस्थेचे माजी कर्मचारी संदीप सदाशिव बिडकर आणि विनोद जालिंदर परबळकर यांनी संजय पडवळकर यांच्याशी संगनमत करून पतसंस्थेचे लेटर पॅड, बनावट शिक्के व व्यवस्थापकाच्या खोट्या सह्या करून पतसंस्थेचे कर्ज फेडले असल्याबाबतचा दाखला घेतला होता. ही बाब उजेडात आल्यानंतर मोहोळ पोलिसात ३० जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याने आरोपी फरार झाले होते.

याप्रकरणी आरोपीने सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला. मोहोळ पोलीस सुरुवाती पासूनच या आरोपींच्या मागावर होते. तपास अधिकारी सपोनि विक्रांत बोधे यांना संशयित आरोपी संजय पडवळकर मोहोळ रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी तपासाची चक्रे फिरवून २६ रोजी त्याच्या मुसक्या आवळल्या. शुक्रवारी सदर आरोपी मोहोळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ३० जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सद्गुरु पतसंस्था अपहार प्रकरणात या गुन्ह्याव्यतिरिक्त माजी कर्मचारी संदीप बिडकर आणि विनोद परळकर यांच्यासह सुनिल भोसले आणि बाळासाहेब गायकवाड या  कर्जदारांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी अद्याप फरार असून लवकरच त्यांना ताब्यात घेऊन गजाआड करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विक्रांत बोधे हे करीत आहेत. या प्रकरणात आरोपीला अटक झाल्याने तालुकाच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.