होमपेज › Solapur › "सुरवात शेट्टीने केलीय याचा शेवट आम्ही करू" : खोत यांचा इशारा

"सुरवात शेट्टीने केलीय याचा शेवट आम्ही करू" : खोत यांचा इशारा

Published On: Feb 25 2018 11:34AM | Last Updated: Feb 25 2018 11:18AMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शनिवारी सोलापूर जिल्‍ह्याच्या दौर्‍यावर असताना त्यांच्या गाडीवर स्‍वाभिमानी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हल्‍ला केला. या घटनेचे पडसाद विविध ठिकाणांसह सोशल मीडियावरही उमटले आहेत. या घटनेनंतर सदाभाऊ यांचे चिरंजीव सागर खोत यांनी फेसबूकवर पोस्‍ट करून नवा वाद निर्माण केला आहे. 

सागर खोत यांनी फेसबुकवर "सुरवात शेट्टी ने केलीय याचा शेवट आम्ही करू...एक मराठा लाख मराठा.." अशी पोस्‍ट टाकल्याने सोशल मीडियावर नवा वाद उफाळून आला आहे. सागर खोत यांच्या या पोस्‍टचा सर्वस्‍तरातून निषेध व्‍यक्‍त होत आहे. या घटनेमध्ये मराठा मोर्चाचा उल्‍लेख केल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून चौफेर टीका होत आहे. 

या प्रकरणात कोणत्याही समाजाचा का संबंध जोडता असा सवालही उपस्‍थित करण्यात आला आहे. तुमच्या दोघांची भांडणे आहेत तुम्‍हीच सोडवा, असा सल्‍लाही नेटीझन्‍सकडून सागर खोत यांना मिळाला आहे. काही नेटीझन्‍सकडून भविष्यात निवडणुका आहेत त्यावेळी आपापली ताकद दाखवा. विनाकारण कोणत्याही समाजाला तुमच्या वादात ओढू नका नाही तर मतदार गप्‍प बसणार नाही. असा इशाराही देण्यात आला आहे.