Fri, Mar 22, 2019 23:50होमपेज › Solapur › सदाभाऊंच्या ऑफिसमध्ये राजू शेट्टींचा फोटो!

सदाभाऊंच्या ऑफिसमध्ये राजू शेट्टींचा फोटो!

Published On: Jan 17 2018 9:13PM | Last Updated: Jan 18 2018 2:18PMसोलापूर : श्रीकांत साबळे

'रक्ताचा सडा सांडला तर बेहत्तर, पण आमच्यातील दोस्तीत दरार पडू देणार नाही' अशाप्रकारच्या दोस्तीचा आदर्श घालून दिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी संघटनेतील अंतर्गत कलहामुळे आता वेगळ्या वाटा चोखळल्या. परंतु, सदाभाऊंनी मात्र खासदार शेट्टी यांचा फोटो आपल्या मंत्रालयातील दालनात कायम ठेवत मैत्रीतील गोडवा कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एकाच झेंड्याखाली दहा वर्षांपूर्वीपासून नावारुपाला आलेली सदा आणि राजू अर्थात सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी या जोडगोळीची अनेक साखरसम्राट आणि राजकारण्यांनी चांगलीच हाय खाल्ली होती. आजही साखरपट्ट्यात ऊस दर प्रश्‍न असू देत किंवा शेतकर्‍यांचे रखडलेले प्रश्‍न यावर कोण तुटून पडेल याचा विचार केला तर, पहिले नाव सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांचेच घेतले जाते.

शेतकर्‍यांप्रती असेलली निष्ठा आणि त्यांना न्याय देण्याची घेतलेली भूमिका यातूनच या जोडीगोळीला राज्य आणि केंद्रातील सत्तांतरात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. याच सत्तांतरातून शेतकर्‍यांसाठी लाठ्याकाठ्या प्रसंगी रक्तही सांडल्यामुळे सत्तेची खुर्चीही मिळाली. स्वाभिमानी संघटनेच्या कोट्यातून सदाभाऊ खोत राज्यमंत्री झाले. शेतकर्‍यांचे नेतृत्व करणारा आपला सखा सवंगडी लाल दिव्यातून शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवेल, अशी आशा दिल्लीत शेतकर्‍यांचे नेतृत्व करणार्‍या राजू शेट्टींना निर्माण झाली.

परंतु, जे काँग्रेस-राष्ट्रवादीने केले तेच शेतकर्‍यांना दाबण्याचे काम भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार करत असल्याचे दिसून आल्यामुळे अंतर्मनाचा आवाज ऐकून खासदार शेट्टी यांना सरकारलाच धारेवर धरण्याचे धोरण स्वीकारले. यातूनच सदा-राजूच्या दोस्तीला नजर लागली. त्यातूनच सदाभाऊंच्या मुलाच्या लग्नात झालेला वारेमाप खर्च पाहूनतर शेट्टी आणखीनच व्यतीत झाले. त्यामुळे दोघांमधील दुरावा वाढतच गेला. 

सदा-राजूच्या जोडीमध्ये ताटातूट झाली. शेट्टींनी संघटनेच्या शिस्तपालन समितीचा निर्णय शिरसंवाद्य मानून सदाभाऊ खोत यांची संघटनेतून हकलपट्टी केल्याची घोषणा करताच याच जोडीसोबत लाठ्याकाठ्या खाणार्‍यांचेही डोळे काहीकाळ पाणावले. पण, नियतिला जे मान्य असते त्यापुढे कुणाचेही चालत नाही ही दगडावरची काळी रेष कायम आहे आणि ती पुसलीही जात नाही.

आपल्या अस्तित्वावर कुठेतरी प्रश्‍नचिन्ह उभे राहते की काय या भावनेतून पुढे सदाभाऊंनी रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. एकमेकांसोबत रक्त वाहणारे सदाभाऊ आणि खासदार शेट्टी समोरासमोर आले तरी बोलायचे टाळत आहेत. याची अनेकांना अनुभूती येत आहे. परंतु, याचवेळी सदाभाऊ खोत यांच्या मंत्रालयातील कक्षात मात्र खासदार शेट्टी यांचा फोटो डौलाने झळकताना अनेकांना या जय-वीरुच्या मैत्रीची आठवण करून देते.

मंत्री खोत यांच्या दालनात आजही खासदार शेट्टी यांचा फोटो झळकत असून, सदाभाऊंनी खासदार शेट्टी यांच्याप्रती असलेली कृतज्ञता या फोटोच्या माध्यमातून व्यक्त केल्याची भावना त्यांचे जवळचे सहकारी बोलून दाखवितात. सत्तेच्या चक्रव्युहात कधी कोण कुणाचा मैतर, तर कोणकुणाचा शत्रू होईल हेच या फोटोतून अधोरेखित होत नाही ना, असा सवालही अनेकांना सतावत आहे.