Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Solapur › दरोडेखोरांनी बंदुकीसह ६५ हजारांचा ऐवज लुटला

दरोडेखोरांनी बंदुकीसह ६५ हजारांचा ऐवज लुटला

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 11:01PM

बुकमार्क करा
टेंभुर्णी : प्रतिनिधी

कन्हेरगाव येथे वागज व भरगंडे यांच्या वस्तीवरील घरात घुसून दरोडेखोरांनी बंदूक, रोख रक्‍कम, दागिने असा 65 हजारांचा ऐवज मारहाण करून लुटून नेला. या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत.

बाळूमामा चौकात मनोहर विठोबा वागज (वय 70) व दत्तात्रय भरगंडे यांच्या शेजारी-शेजारी वस्त्या आहेत. सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास भरगंडे यांच्या पत्र्यावर काही तरी वाजल्याच्या आवाजाने वागज हे जागे झाले. त्यांनी कशाचा आवाज आला, हे पाहण्यासाठी दार उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा बाहेरून बंद केला असल्याचे दिसून आले. यामुळे त्यांनी दत्तात्रय भरगंडे यांना आवाज दिला व दरवाजा उघडण्यास सांगितले. भरगंडे यांनी दरवाजा उघडताच 25 ते 30 वयाचे चार अज्ञात दरोडेखोर घरात शिरले. त्यांचे अन्य साथीदार बाहेर टेहाळणी करीत होते. त्यापैकी दोघेजण वागज व भरगंडे यांच्याजवळ थांबले, तर घरात शिरलेल्या दोघांनी सामान अस्ताव्यस्त फेकून काही सापडते का, याची पाहणी केली. दरोडेखोरांनी कपाटात ठेवलेले 10 हजार रुपये, वागज यांच्या पत्नी मंगल यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे 20 हजार रुपये किंमतीचे मणीमंगळसूत्र, 4 ग्रॅम वजनाचे 8 हजार रुपयांचे कानातील सोन्याचे झुबे, 12 बोअरची 2 हजार रुपये किमतीची लायसन्सची बंदूक, 500 रुपयांची 10 काडतुसे, 10 हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही असा एकूण 50 हजारांचा ऐवज चोरून नेला व जाताना घरास बाहेरून कडी लावली.

दरम्यान, वागज यांच्या अगोदर याच दरोडेखोरांनी दत्तात्रय भरगंडे यांच्या घराची कडी वाजवली. त्यांनी घर उघडताच डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले. तसेच त्यांच्या पत्नी सविता यांच्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाचे 10 हजार रुपये किमतीचे मणीमंगळसूत्र व खिश्यातील रोख 5 हजार रुपये असा 15 हजारांचा ऐवज चोरून नेला असल्याचे भरगंडे यांनी सांगितले.