Wed, Mar 20, 2019 23:38होमपेज › Solapur › दुकाने फोडून लाखोंचे मोबाईल लंपास

दुकाने फोडून लाखोंचे मोबाईल लंपास

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 10:50PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

शिंदे चौक व चौपाड परिसरातील राजश्री  व आदित्य नावाच्या मोबाईल फोनची  दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे मोबाईल हँडसेट  चोरून  नेले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत सायंकाळी  उशिरापर्यंत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अमर   महिमकर   यांचे    शिंदे  चौकात    इंदिरा   कन्या प्रशालेसमोर  राजश्री    मल्टिब्रँड मोबाईलचे दुकान आहे. या दुकानाचे साईबाबा मंदिराकडील शटर उचकटून पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी दुकानातील लाखो रुपये किंमतीचे मोबाईल चोरुन नेले. शटर उचकटल्यानंतर आतील जाड काच चोरट्यांनी फोडली आणि दुकानात प्रवेश केला. दुकानात शोकेसमध्ये ठेवलेले विविध कंपनींचे स्मार्ट फोन चोरुन नेले. या दुकानातून नेमके किती किंमतीचे मोबाईल फोन चोरीस गेले याची मोजदाद सायंकाळीदेखील सुरू होती. या दुकानाच्या बाहेर व आजूबाजूस कोठेही सीसीटीव्ही नाहीत.  तसेच  चोरट्यांनी   याच  परिसरातील जनता बँकेसमोरील कोपर्‍यावर असलेले प्रसन्न मेहता यांचे आदित्य कम्युनिकेशन हे मोबाईलचे दुकानही फोडले आणि दुकानातून मोठ्या किंमतीचे 31 मोबाईल हँडसेट चोरून नेले. आदित्य कम्युनिकेशन दुकानाच्यासमोरील बाजूचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. या दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत, परंतु ते सुरू झालेले नाहीत. 

या दोन्ही घटनांची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे पथक, श्‍वान पथक, ठसेतज्ज्ञ यांनीही घटनास्थळी धाव घेऊन चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. पोलिस निरीक्षक संजय जगताप तपास करीत आहेत.