Sun, Apr 21, 2019 04:31होमपेज › Solapur › सोलापूर : लुटीचा बनाव करणाऱ्या पोलिसाची आत्महत्या

सोलापूर : लुटीचा बनाव करणाऱ्या पोलिसाची आत्महत्या

Published On: Mar 21 2018 7:55AM | Last Updated: Mar 21 2018 8:20AM 

सोलापूर : पुढारी ऑनलाईन

सोलापूर शहर पोलिसांच्या पेट्रोल पंपावरील 5 लाख रुपयांच्या रोकड लुटीप्रकरणीतील फिर्यादी सहाय्यक फौजदार मारूती लक्ष्मण राजमाने (वय 56, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) यांनी बुधवारी सकाळी तुळजापूर रोडवरील शेळगी पुलावरून उडी टाकत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, या आत्महत्येमुळे लूटप्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अशोक चौकातील सोलापूर शहर पोलिसांच्या पेट्रोल पंपावरील इनजार्च सहायक फौजदार मारूती राजमाने यांनी पेट्रोल पंपावर जमा झालेली 5 लाख रुपयांची रोकड घेऊन जाताना अज्ञात सहा जणांच्या टोळीने आपल्याला मारहाण करून ती रोकड लुटून नेल्याबाबत तक्रार दाखल केली होती.

सुरुवातीला जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून नंतर तो जोडभावी पेठ पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांचीच लाखोंची रोकड लुटल्यामुळे पोलिस आयुक्तांपासून सर्वच पोलिस अधिकार्‍यांनी हे प्रकरण चांगलेच गांभीर्याने घेऊन याचा तपास सुकू केला होता. परंतु, फिर्यादी राजमाने यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी तीन वेळा घटनास्थळ बदलले. त्यामुळे एका पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा दुसर्‍या पोलिस ठाण्यात वर्ग करावा लागला.

घटनेच्या रात्री वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी राजमाने यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार करून चौकशी केल्यावर राजमाने याच्या घरातून सुमारे दोन लाखांची रोकड मिळाली होती. ही रोकड कोणाची व कशी आली याचा तपास पोलिस यंत्रणा करीत होती. या रकमेतील काही रक्कम ही पेट्रोल पंपाचा भरणाच असल्याचेही सांगण्यात येते होते.

एकीकडे पोलिसांचा तपास सुरू असतानाच बुधवारी सकाळी राजमाने हे घरात माँर्निंंग वाँक जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी तुळजापूर रोडवरील शेळगी पुलावरून उडी घेत गळफास घेवून आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, या आत्महत्येमुळे प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

Tags : police officer, police officer suicida, robbery case,suicide in Solapur