Tue, May 21, 2019 22:16होमपेज › Solapur › टेंभुर्णीत रात्रीत 8 दुकाने फोडली

टेंभुर्णीत रात्रीत 8 दुकाने फोडली

Published On: May 11 2018 9:58PM | Last Updated: May 11 2018 8:54PMटेंभुर्णी :  प्रतिनिधी

टेंभुर्णी शहरात हॉटेल चालकाचा बंगला फोडून 2 लाख 56 हजारांची  चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच काल, गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत पुन्हा आठ दुकाने फोडल्याने टेंभुर्णी शहरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कुर्डुवाडी रोडवर बाह्यवळण रस्त्याजवळील काळे शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांना टार्गेट करीत गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल आठ दुकानांचे शटर कटावणीने उचकटून 38 हजार 400 रुपयांची रोकड व इतर साहित्यांची धाडसी चोरी केली आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी चोरी झाली, त्या शॉपिंग सेंटरच्या वरील मजल्यावर टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील एक पोलिस उपनिरीक्षक राहत आहेत.

या चोरीची गौरी ड्रेसेसचे मालक सीताराम शिवाजी सुतार (वय 35, रा. टेंभुर्णी) यांनी फिर्याद दिली असून, यात म्हटले आहे की, ते गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे गौरी ड्रेसेस हे दुकान बंद करून घरी गेले. यानंतर शुक्रवारी सकाळी 5.45 वा. दुकानासमोर साफसफाई करण्यास व पाणी मारण्यास आले असता त्यांना दुकानाचे शटर वर केल्याचे दिसून आले. आत जाऊन पाहिले असता काऊंटरच्या गल्ल्यातील 25 हजार रुपये गायब झाल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी शेजारी पाहिले असता मोरया ट्रेडर्सची दोन्ही शटरही उचकटलेली दिसून आली. यामुळे त्याचे मालक महादेव बिभीषण काळे यांना चोरीची माहिती देण्यात आली. त्यांनी चोरीची माहिती घेतली असता गल्ल्यातील आठ हजार रुपये चोरीस गेल्याचे दिसून आले. हॉटेल ज्योती या संदीप विजय लोखंडे यांच्या हॉटेलच्या दोन्ही गाळ्यांची  शटर उचकटून 5 हजार रुपये रोख व इतर साहित्य चोरून नेले.

त्याचप्रमाणे मुद्रा टायर्स अँड व्हील अलायमेंट या विशाल हनुमंत घाडगे (रा. अकलूज) यांच्या शोरूमचेही दोन्ही गाळ्यांचे शटर उचकटून सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दोन हजारांचे नुकसान केले आहे. सोनाई पशुखाद्य या मच्छिंद्र अजिनाथ कदम यांच्या गाळ्याचे शटर तोडून नुकसान केले आहे. तसेच श्रुती बेकरी अँड  डेअरी प्रोडक्ट या सचिन पवार व निलेश गावडे या गाळ्याचे शटर उचकटून  आतील 400 रोख चोरून नेले. याप्रमाणे आठ गाळ्यांचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 38 हजार 400 रुपये रोख व इतर साहित्य चोरून नेले व शटरचे नुकसान केले.