Sun, Aug 25, 2019 19:51होमपेज › Solapur › दरोडेखोरांचा धुमाकूळ

दरोडेखोरांचा धुमाकूळ

Published On: Sep 04 2018 1:20AM | Last Updated: Sep 03 2018 11:38PMवैराग : प्रतिनिधी

येथील छत्रपती शिवाजीनगर येथे राहणार्‍या एका माजी प्राचार्यांच्या घरावर सहा दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीने मारहाण करून घरातील 60 हजारांचा ऐवज पळविल्याची धक्‍कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. हरिश्‍चंद्र बाबुराव भोसले, असे दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या माजी प्राचार्यांचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. वैराग पोलिसांत अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजीनगर येथे राहणारे तुळशीदास जाधव प्रशालेचे माजी प्राचार्य हरिश्‍चंद्र भोसले हे आपल्या घरी पत्नीसह राहतात. सोमवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्यादरम्यान अज्ञात सहा दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला.  घरात कोणीतरी आले असल्याचा आवाज भोसले यांना आला. त्यावेळी दरोडेखोरांनी त्यांना दाबून धरले. भोसले यांनी उठण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी भोसले यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर भोसले गच्चीवर पळत गेले. वर जाऊन त्यांनी शेजार्‍यांना ओरडून उठवण्याचा प्रयत्न केला. 

तोपर्यंत दरोडेखोरांनी कपाटातील तीस हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण, दहा हजार रुपयांची सोन्याची कर्णफुले, सोन्याची  साखळी, चांदीची वाटी, साडेचार हजार रोख, पाच हजार रुपये किमतीचा नोकिया कंपनीचा मोबाईल असा सुमारे साठ हजार रुपयांचा ऐवज पोबारा केला होता. 

आरडाओरड ऐकून नागरिक घटनास्थळी धावले असता भोसले दाम्पत्य प्रचंड घाबरलेले होते.  दरोडखोरांनी केलेल्या मारहाणी मध्ये हरिश्‍चंद्र भोसले हे जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच दहशत निर्माण झाली होती. दरोडेखोरांचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून दरोडेखोरांचे ठसे घेतले असून श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या घटनास्थळी बार्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, पोलिस निरीक्षक सुहास जगताप व स्थानिक सोलापूर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे आदींनी भेट देऊन पाहणी केली. दरोड्याचा गुन्हा घडल्याचे समजताच परिसराची नाकाबंदी करण्यात आली.

घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुहास जगताप हे करीत आहेत.
सोलापूर/करमाळा : प्रतिनिधी
सोमवारच्या पहाटे केम रेल्वेस्थानकावर चोरट्यांनी वाराणसी-म्हैसूर एक्स्प्रेस गाडीवर 10 ते 12 दरोडेखोरांनी दरोडा घातला. सुमारे 40 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज व एक मोबाईल, असा एकूण 50 हजार रुपयांपर्यंतचा ऐवज पळविला आहे. यामुळे रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांच्या  सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. वाडी रेल्वेस्थानकावरील रेल्वे पोलिसांकडे याची नोंद झाली असून सोमवारी सायंकाळपर्यंत सोलापूर रेल्वे पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला होता. 

वाराणसी-म्हैसूर एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेत प्रवास करत होती. दौंड स्थानकावरून निघाल्यावर सोमवारी पहाटेदरम्यान केम स्थानकावजवळ आल्यावर तिचा वेग कमी झाला. त्याचा गैरफायदा दरोडेखोरांनी घेत एस-7 या डब्यावर हल्ला चढविला. सीट क्र. 66 (एस-7) व सीट क्र 47 (एस-8) यावर बसलेल्या प्रवाशांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. गाढ झोपेत असलेल्या अनेक प्रवाशांनी खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या. त्याचाच गैरफायदा 10 ते 12 दरोडेखोरांनी घेतला. खिडकीमधून हात घालून झोपलेल्या महिला प्रवाशांची सोन्याची चेन हिसका मारुन पळविण्यात आली व दुसर्‍या प्रवाशाचा खिशामधील महागडा मोबाईल चोरुन नेला. ज्यावेळी प्रवाशांना चोरी झाल्याचे लक्षात आले त्यावेळी त्यांनी तिकीट पर्यवेक्षक ब्रिजभूषण यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्यांनी वाडी येथील रेल्वे पोलिसांकडे ही तक्रार दिली. सोमवारी दिवसभर ही तक्रार कुर्डुवाडी रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया चालू होती. अखेर हा गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. अशाप्रकारे रेल्वे बोगीवर दरोडा पडण्याच्या घटना वारंवार घडत असून दरोडेखोरांची टोळीच या लोहमार्गावर सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. या टोळीचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर उभे ठाकलेले आहे.

भिगवण ते कुर्डुवाडी स्थानकादरम्यान वाढल्या चोर्‍या
कुर्डुवाडी ते भिगवण या लोहमार्गावर रात्रीच्या वेळी क्रॉसिंगला थांबलेल्या रेल्वेगाड्यांवर वारंवार दरोडा, चोरी व लुटालुटीच्या घटना सातत्याने घडत आहेत. भाळवणी, पोफळज, वाशिंबे, पारेवाडी, जिंती ही रेल्वे स्टेशने संवेदनशील बनली आहेत. दोन दिवसांअगोदर चेन्‍नई-दादर या गाडीवर दरोडा टाकून 1 किलो सोने लंपास करण्यात आल्याची घटना ताजी असताना पुन्हा दरोड्याचा प्रयत्न झाला आहे.