Mon, May 27, 2019 01:42होमपेज › Solapur › अक्‍कलकोट तालुक्यातील रस्त्यांची लागली वाट 

अक्‍कलकोट तालुक्यातील रस्त्यांची लागली वाट 

Published On: May 28 2018 1:31AM | Last Updated: May 27 2018 9:41PMअक्‍कलकोट : वार्ताहर

सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभाग या दोन्ही अंतर्गत संपूर्ण अक्‍कलकोट तालुक्यातील रस्ते विभागले गेलेले आहेत. दोन्ही मिळून 800 ते 900 कि.मी.चे रस्ते असून त्यापैकी बहुतांश रस्ते खराब होऊन चाळण झालेले आहेत. एखादा चांगला रस्ता शोधूनही मिळताना दिसत नाही. एकूणच तालुक्यातील जिल्हा प्रमुख मार्ग, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते अशा लहान मोठे सर्वच रस्त्यांची वाट लागलेली आहे.

अक्‍कलकोट तालुका तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये नावारुपाला आलेले आहे. यानिमित्ताने विविध विभागाचे मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दर्शनासाठी येण्या-जाण्याचे सत्र सतत चालू असते. मात्र त्या मानाने तालुक्यातील सर्व रस्ते चकाचक असणे गरजेचे असताना झालेले नाहीत. 

अक्‍कलकोट ते हन्नूर 16 कि.मी.चे अंतर असून 31 डिसेंबर 2017 पर्यंत महाराष्ट्र शासनाने खड्डामुक्त राज्याची घोषणा केलेली होती. त्या दरम्यान संपूर्ण खड्डे भरण्यात आले होते. या घटनेला चार महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला नसतानाही सदर रस्त्यावरील खड्डे पुन्हा निर्माण होताना दिसत आहेत. तसेच अक्‍कलकोट-करजगी-मंगरुळ-तडवळ-म्हैसलगे हे अंतर 35 कि.मी.चे आहे. या मार्गावरील 50 टक्के सुध्दा खड्डे भरण्यात आलेले नाहीत. हे काम सुशिक्षित अभियंता सोलापूरचे मिलिंद भोसले यांनी केले असून सदरचे काम अपूर्ण ठेवलेले आहे. अक्‍कलकोट-वागदरी-भुरीकवठे-बोळेगाव हद्दीपर्यंत 27 कि.मी.चे अंतर आहे. त्यापैकी केवळ वागदरी ते भुरीकवठे 7 कि.मी.पर्यंत खड्डे भरण्यात आलेले आहे. उर्वरित जैसे थे त्या स्थितीत आहे. नागणसूर-तोळणूर-माशाळ हद्दीपर्यंत 26 कि.मी. रस्ता आहे. हा रस्ता पूर्णपणे भरण्यात आले असल्याचे सांगण्यात असले तरी प्रत्यक्षात स्थिती वाईट आहे. हा रस्ता सुशिक्षित अभियंता मुंडफणे अकलूज यांनी केला आहे.

मैंदर्गी-नागूर-इब्राहिमपूर-मुगळी हा 15 कि.मी.चा रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनला आहे. अक्‍कलकोट ते हत्तीकणबस-चिक्केहळ्ळी-सलगर हा 15 कि.मी.चा रस्ता आहे. हा रस्ता पार करण्यासाठी वाहनधारकांना तब्बल दीड तास लागतो. इतके भले मोठे खड्डे या रस्त्यावर निर्माण झाले आहेत. शिरवळ-सदलापूर-तोरणी हा 10 कि.मी.चा रस्ता आहे. या मार्गावरील खड्डे भरण्यास चालू झाले असले तरी पूर्ण होण्याआधीच मागचे खड्डे पुन्हा निर्माण होत आहेत. एकंदरीत निकृष्ट पध्दतीने काम झालेले आहे. अक्‍कलकोट स्टेशन-जेऊर-हंजगी-कर्जाळ-हालहळ्ळी-तीर्थ-चपळगाववाडी ते चपळगाव हा 45 कि.मी. अंतराचा रस्ता आहे. या मार्गावरील निम्मे रस्त्यावरील खड्डे भरले असून उर्वरित खड्डे भरण्यासाठी संबंधितांना मुहूर्त लागेना झाले आहे. संगोगी (ब)-तळेवाड-सातनदुधनी-कलप्पावाडी-उडगी हा मार्ग 15 कि.मी.चा आहे. उडगी ते कडबगाव वगळता सर्व रस्ते खड्ड्याने माखलेले आहेत. दुधनी-निंबाळ हा 3 कि.मी.अंतराचा रस्ता इतक्या कमी अंतराचा रस्तादेखील संबंधितांना करता आले नाही. 

अक्‍कलकोट-गौडगाव-शावळ-हिळ्ळी-मणूर हद्दीपर्यंत 20 कि.मी.चा रस्ता आहे. या मार्गावरील खड्ड्यांनी संपूर्ण रस्त्याची चाळणी झालेली आहे. अक्‍कलकोट-बासलेगाव-गळोरगी-उडगी हा मार्ग 16 कि.मी. अंतराचा आहे. संपूर्ण रस्ता खराब असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था निर्माण झालेली आहे. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणार्‍या अक्‍कलकोट-मैंदर्गी रस्त्यावरील रामपूर, इटगे, गौडगाव खु॥, मिरजगी, जकापूर, कंठेहळ्ळी, संगोगी (आ), तोरणी, नागूर याबरोबरच कोळीबेट, काळेगाव, सिंदखेड, मोट्याळ, कोळेकरवाडी, बावकरवाडी, जेऊरवाडी, बिंजगेर, रुद्देवाडी, कोन्हाळी यासह शेकडो गावांना जोडणारे लहान-मोठे रस्ते मिळून तब्बल 600 कि.मी.चे अंतर आहे. असे एकूण 800 ते 900 कि.मी.चे रस्ते असून त्यापैकी 80 टक्के रस्ते अत्यंत खराब होऊन खड्डेमय झालेले आहेत. संपूर्ण चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना जीव मुठीत धरुन चालवावे लागत आहे. त्यामधूनही दररोज एखादा लहान मोठे अपघात होवून काहींना जीव गमवावे लागले आहे. तर काहीजणांना अपंगत्व आलेले आहे. तालुक्यातील सर्वच रस्त्याची वाट लागलेली असताना अधिकारी व पदाधिकारी संवेदनशील नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खराब रस्त्याचा मोठा फटका तालुक्याच्या दळणवळणाबरोबरच ऊस वाहतूकप्रसंगी बसत आहे.