होमपेज › Solapur › ‘ते’ झाड अजूनही ठरतेय मृत्यूचा सापळा

‘ते’ झाड अजूनही ठरतेय मृत्यूचा सापळा

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 9:52PM

बुकमार्क करा

बार्शी :  तालुका प्रतिनिधी 

पुणे-लातूर राज्यमार्गावरील पांगरीनजिक (ता. बार्शी) असलेल्या नीलकंठेश्‍वर मंदिराजवळ कारवर चिंचेचा महाकाय वृक्ष कोसळून त्याखाली चारजण  अडकले, पण सुदैवाने जीवितहानी टळली. घटना घडून 24 तासांपेक्षाही जास्त कालावधी उलटून जाऊनही राज्यमार्ग आवश्यक तेवढा सुरळीत करण्यात आला नसल्यामुळे वाहनधारकांमधून  सार्वजनिक बांधकाम विभागासंदर्भात नाराजी व्यक्त केली जात आहे. 

चिंचेचे झाड रस्त्यावरून पूर्णपणे काढण्यात न आल्यामुळे हा महाकाय वृक्ष मृत्यूचा सापळा ठरू पाहात  आहे. चिंचेच्या झाडामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली असली तरी पडलेले झाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी त्वरित काढून न घेतल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. झाड काढून साफसफाई करणे गरजेचे आहे.  

शनिवार, 10 दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कोथरूड (पुणे) येथील चार तरूण कारमधून पांगरीमार्गे कळंबकडे जाताना मंदिराजवळ चालू कारवर दोन दिवसांपूर्वी झुकलेल्या अवस्थेत असलेले चिंचेचे झाड कोसळले होते. पांगरी पंचक्रोशीमधील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन चौघांची सुखरूप सुटका केली होती. 

दुर्दैवी घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी करणे गरजेचे असतानाही अद्याप पाहणी करण्यात आली नसल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 
चिंचेचे झाड दोन दिवसांपूर्वीच वादळी वार्‍यामुळे झुकलेले असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास  आणून दिले होते. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळकाढूपणा केल्यामुळे अखेर ते झाड  एका कारवर कोसळले. नशीब बलवत्तर म्हणून कारमधील चौघा तरुणांचे प्राण बालंबाल बचावले. 

राज्यमार्गावर मोठी दुर्घटना टळली असली तरी सध्या पडलेले ते झाड राज्यमार्गावरून येणार्‍या- जाणार्‍या वाहनधारकांना  धोकादायक ठरत आहे. वाहनधारकांना झाडामुळे पुढील रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे दुर्घटनास्थळी रस्ता खूपच  अरूंद  असल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या राज्यमार्गावर पडलेल्या चिंचेच्या फांद्या आलेल्या  असल्यामुळे जेमतेम एकच वाहन रस्ता ओलांडू शकत  आहे. एकेरी वाहतुकीमुळे तेथे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. 

एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच संबंधितांना जाग येणार आहे का, असा प्रश्‍न सामान्य जनतेमधून विचारला जात आहे. लोकांच्या जीविताशी संबंधित विभाग खेळत  असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तरी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पडलेल्या झाडाची योग्यती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.