Sun, Apr 21, 2019 05:49होमपेज › Solapur › शाळांनी खाल्ला अडीच लाख किलो तांदूळ?

शाळांनी खाल्ला अडीच लाख किलो तांदूळ?

Published On: Aug 04 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 10:26PMसोलापूर : दीपक होमकर  

बोगस पटसंख्या दाखवून शाळेमध्ये अस्तित्वात नसलेल्या विद्यार्थ्यांच्या नावे शहरातील 61 शाळांनी तब्बल दोन लाख 59 हजार 80 किलोपेक्षा अधिक तांदूळ एका शेैक्षणिक वर्षात (दहा महिन्यांत) खाल्ला असल्याची माहिती समोर येत आहे. ही आकडेवारी 2011 च्या  पटनिहाय होणार्‍या प्रति विद्यार्थ्यांना मिळणार्‍या तांदूळानुसार असून त्यावेळच्या विद्यार्थी उपस्थितीनुसार यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होणार आहे.

2011 साली राज्यभरात एकाच वेळी सर्व  शाळांची पटपडताळणी झाली. त्यामध्ये सोलापुरातील 62  शाळांमध्ये एकूण उपस्थित विद्यार्थ्यांच्या दुप्पट पटसंख्या दाखविण्यात आली होती. या 62 शाळांनी दाखविलेली  पटसंख्या 16218 इतकी  होती, तर प्रत्यक्षात उपस्थिती मात्र 1076 इतकीच होती. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांच्या नावे त्या शाळांना दिलेला तांदूळ कुणी खाल्ला, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

बोगस पटसंख्या दाखवून विद्यार्थ्यांच्या नावाने तांदूळ खाणार्‍या शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोलापूर महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. पन्नास टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असलेल्या 62 शाळांना त्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्यातील कन्नड मुलांची शाळा क्र. 1 ची पटसंख्या व उपस्थिती शून्य असल्याने ही शाळा वगळता बाकी सर्व शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांपेक्षा दुप्पट तांदूळ मागविण्यात आला होता. हे कागदोपत्री समोर येत आहे.

केंद्र सरकारच्यावतीने शालेय पोषण आहारांतर्गत राज्यातील सर्व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी तांदूळ देण्यात येतो. त्यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज शंभर ग्रॅम तांदूळ पुरवला जातो, तर सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरविला जातो. शाळेत उपस्थित असणार्‍यांच्या संख्या शाळांनी प्रशासनाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यावर त्यांच्याकडून त्यानुसार तांदूळ पुरवठा होतो. मात्र हे सर्व 10765 बोगस विद्यार्थी केवळ पहिली ते पाचवीचे असे गृहित धरले तरी दररोज 1076 किलो तांदूळ होते. त्यातील अनेक विद्यार्थी हे सहावी, सातवीचे असल्याने त्या प्रत्येक विद्यार्थ्यांमागे प्रति दिवस 50 ग्रॅम तांदूळाची वाढ होणार आहे.  मात्र तूर्तास महापालिकेच्या प्रशासनाकडे याची संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र ही माहिती घेण्याचे काम कालपासून सुरु झाले असून त्या अहवालात नेमका किती तांदूळाचा अपहार झाला, हे स्पष्ट होणार आहे.

दररोज 44  हजार रुपयांची झाली लूट
शालेय पोषण आहारातंर्गत देण्यात येणारा तांदूळ शिजविण्यासाठी एका विद्यार्थ्यामागे 4 रुपये 13 पैसे दिले जातात. 10765 बोगस विद्यार्थ्यांची ही रक्कम 44 हजार 459 रुपये 45 पैसे इतकी होते. त्यानुसार महिन्याभराचे (24 दिवसांची) ही रक्कम दहा लाख 67 हजार 26 रुपये इतकी होते, तर दहा महिन्यांची रक्कम तब्बल एक कोटी सहा लाख 70 हजार 268 इतकी होते.