Sun, Apr 21, 2019 04:34होमपेज › Solapur › सोलापुरात महसूल प्रशासनात खांदेपालट

सोलापुरात महसूल प्रशासनात खांदेपालट

Published On: Aug 24 2018 10:57PM | Last Updated: Aug 24 2018 10:41PMसोलापूर : प्रतिनिधी   

राज्य सरकारने महसूल विभागात खांदेपालट केला असून जिल्ह्यातील सहा तहसीलदार, तर दोन उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे व निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे, तसेच जिल्ह्यातील चार तहसीलदारांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या असून दोन तहसीलदारांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

करमाळ्याचे तहसीलदार संजय पवार यांची सांगलीला बदली झाली आहे, तर त्यांच्या जागी खटाव तालुक्यातून सुशील बेल्हेकर आले आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार अरुणा गायकवाड यांची जिल्ह्यातच निवडणूक शाखेच्या तहसीलदार म्हणून बदली झाली, तर त्यांच्या जागी पुणे येथील तहसीलदार महेश पाटील हे बदलून आले आहेत. सोलापूर महसूल शाखेच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे यांची कोल्हापूरला बदली झाली असून, त्यांच्या जागी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे आले आहेत. माळशिरसचे तहसीलदार बी. एस. माने यांची माण येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर जत येथून अभिजित सावर्डे हे येणार आहेत. 

सोलापूर महसूल विभागातील अंजली मरोड यांची अक्कलकोट येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या तहसीलदारांना नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने सहसचिव मा. आ. गुट्टे यांनी दिले आहेत.

सरकारने राज्यातील महसूल विभागातील जवळपास 24 उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये सोलापूरच्या दोन उपजिल्हाधिकार्‍यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्हा पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांची पुणे येथे उपजिल्हाधिकारी म्हणून, तर त्यांच्याजागी सांगलीच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांची बदली झाली आहे. निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांची कोल्हापूरला पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाली, तर सोलापूरला पुरवठा अधिकारी म्हणून कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांची बदली झाली आहे. लवकरच नवे अधिकारी आपला पदभार घेणार आहेत.

या तहसीलदारांच्या झाल्या बदल्या 

1. संजय पवार     तहसीलदार, करमाळा    विशेष कार्यकारी दंडाधिकारी, सांगली

2. अरुणा गायकवाड     तहसीलदार, सोलापूर (संगायो)    तहसीलदार (निवडणूक शाखा), सोलापूर

3. शीतल मुळे     तहसीलदार, सोलापूर (महसूल)    तहसीलदार (जिल्हाधिकारी कार्यालय), कोल्हापूर

4. बी. एस. माने     तहसीलदार, माळशिरस    तहसीलदार, माण (सातारा)

5. दीपक वजाळे     तहसीलदार, अक्कलकोट    तहसीलदार, तासगाव (सांगली)

6. अंजली मरोड     तहसीलदार (अप्पर चिटणीस), सोलापूर    तहसीलदार, अक्कलकोट