होमपेज › Solapur › अखेर मोहोळमधील पुलाखालील जाळी काढली

अखेर मोहोळमधील पुलाखालील जाळी काढली

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:42PM

बुकमार्क करा
मोहोळ ः महेश माने

मोहोळमधील शहर शिवाजी चौक परिसरातील उड्डाण पुलाच्या खालची जाळीची एक लेन महामार्ग प्रशासनाने मंगळवार, 26 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता काढली आहे. त्यामुळे पंढरपूरकडून येणार्‍या व जाणार्‍या वाहनांमुळे होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्‍न कायमस्वरुपी मिटला आहे. त्यामुळे या भागात होणारे अपघात येत्या काळात टाळता येणार आहेत. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडे तहसीलदार अमित माळी व पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या माध्यमातून भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजीवदादा खिलारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मोहोळ शहर व तालुकावासियांनी समाधान व्यक्त केले आहे. दैनिक ‘पुढारी’ने वेळोवेळी सडेतोड वार्तांकन करत हा विषय ऐरणीवर आणला होता.

मोहोळ शहरासह तालुक्यातून जाणार्‍या सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळ येथील अपूर्ण कामे पूर्ण करण्याबरोबरच मोहोळ शहरातील एसटी स्टॅण्ड परिसरातील उड्डाण पुलाखालची एका लेनमधील जाळी काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गेल्या महिन्यात महामार्ग प्रशासनाला दिले होते. 27 नोव्हेंबर रोजी झालेल्या सोलापूर येथील महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी इतरही सूचना दिल्या होत्या. त्यामुळे महामार्ग प्रशासन व जिल्हाधिकारी प्रशासनाकडे मोहोळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तहसीलदार माळी यांच्या माध्यमातून महसूल प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनच प्रलंबित प्रश्‍न निकालात निघाला आहे.यापूर्वी पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी पुढाकार घेत मोहोळचे तहसीलदार बी. आर. माळी यांच्या दालनात भारतीय दलित महासंघाचे संजीवदादा खिलारे व  पदाधिकार्‍यांसह महामार्ग प्रशासनाच्या समवेत बैठक घेतली होती. या बैठकी बाबतचा अहवाल तहसीलदार माळी यांनी जिल्हाधिकारी प्रशासनास पाठविला होता.  त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी ही तातडीची बैठक आयोजित करून महामार्गावरील शेटफळ ते पाकणी पाटी रस्त्यालगत दोन्ही बाजुने सर्व्हिस रोड आणि शेटफळ रस्ता, यावली-अनगर रस्ता, नरखेड रस्ता येथील उड्डाण पूल, भुयारी मार्ग याबाबत सहा पदरीचा रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला असल्याची माहिती भारतीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या वतीने देण्यात आली होती.

मोहोळ शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग आणि चार राज्यमार्ग जातात. बाह्यवळण मार्ग नसल्याने मोहोळ शहरातूनच जड वाहने जातात. त्यामुळे मोहोळमधील पंढरपूरकडे जाणार्‍या अंतर्गत रस्त्यालगत उड्डाण पुलाच्या खाली वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे या उड्डाण पुलाखालील  एका लेनची जाळी काढण्याची मागणी आम्ही महामार्ग प्रशासनाकडे केली होती. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आवश्यक त्या सूचना देऊन सदरची जाळी काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महामार्ग प्रशासनाने सदरची जाळी काढून उड्डाण पुलाची आणखी एक मार्गीका पंढरपूर-सोलापूर मार्गाच्या वाहतुकीसाठी खुली केली आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात होत असलेली वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 
- राजेंद्र मस्के (पोलिस निरीक्षक मोहोळ)