Sat, Apr 20, 2019 17:51होमपेज › Solapur › उजनीतून पाणी सोडण्यासाठी बेगमपूर येथे रास्ता रोको

उजनीतून पाणी सोडण्यासाठी बेगमपूर येथे रास्ता रोको

Published On: May 25 2018 1:21AM | Last Updated: May 24 2018 9:45PMबेगमपूर : वार्ताहर

उजनीतून भीमा नदीत तत्काळ पाणी सोडावे, सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत आदी मागण्यांसाठी भीमा नदीकाठ बचाव संघर्ष समितीच्यावतीने गुरूवारी जि.प. सदस्या शैला गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर-मंगळवेढा मार्गावरील बेगमपूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

तब्बल दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली. पाणी सोडण्याचे लेखी आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतरच हे आंदोलन थांबविण्यात आले. दरम्यान, पाण्यासाठी शेतकर्‍यांना वेठीस धरल्यास अधिकार्‍यांना फिरू देणार नाही, दिसतील तेथे घेराव घालून जाब विचारू, असा इशाराही गोडसे यांनी यावेळी दिला.

भीमा नदीत पाणी सोडण्याच्या विषयावर नदीकाठच्या शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. महिन्याभरापासून नदीचे पात्र कोरडे असून उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जि.प. सदस्या शैला गोडसे यांनी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार सकाळपासूनच नदीकाठच्या प्रत्येक गावातील शेतकर्‍यांनी बेगमपूर चौकात गर्दी केली होती. सकाळी 10 वाजता स्वत: गोडसे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी रस्त्यावर ठिय्या दिला. दीड तास हे आंदोलन सुरूच राहिल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. कार्यकारी अभियंता नारायण जोशी यांनी येऊन निवेदन स्वीकारले.  29 जून ते 2 मेदरम्यान पाणी सोडण्याची कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्‍वासन दिले.

यावेळी पं.स. सदस्य नागराज पाटील, जकराया शुगरचे चेअरमन अ‍ॅड. बी.बी. जाधव, जि.प. सदस्य नितीन नकाते, राजेश पवार, डॉ. बाळासाहेब सरवळे, रफीक पाटील, आप्पासाहेब पाटील, प्रा. माऊली जाधव, भारत आतकरे, हरिभाऊ काकडे, जगदीश पाटील, हरिभाऊ घुले, विनोद कदम, विशाल पवार, दादा पाटील, नागनाथ माने, बजरंग शेंडेकर, बंडू कलुबर्मे, तानाजी चोरगे, केशव पाटील, आनंद जाधव, सुभाष बाबर, अशोक भोसले, सुग्रीव पाटील, कमलाकर कदम आदींसह बेगमपूर, अरबळी, मिरी, अर्धनारी, येणकी, माचणूर, बठार, तामदर्डी, सिध्दापूर, आंबेचिंचोली आदी नदीकाठच्या गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.