Sat, Mar 23, 2019 16:05होमपेज › Solapur › राष्ट्रवादीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 

राष्ट्रवादीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी    

गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले भाजप-शिवसेना सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्‍वासने देऊन सरकारने  जनतेची फसवणूक केली आहे. अनेक क्षेत्रांत कोंडीत सापडलेले सामान्य नागरिक आत्महत्येस प्रवृत्त होतील, अशी गंभीर परिस्थिती भाजप सरकारने निर्माण केली आहे . त्यामुळे या फसव्या  सरकारला धडा शिकविण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक प्रदीप गारटकर यांनी केले. 

 सोलापूर शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निरीक्षक प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली  बुधवारी भाजप सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

    गारटकर म्हणाले, शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यावसायिक, शिक्षक व डॉक्टर अशा सर्वच स्तरांमध्ये भाजप सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या नोटाबंदी व जीएसटीच्या आततायी निर्णयामुळे देशाची व राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाबाबत दिलेली आश्‍वासने सरकारने न पाळल्यामुळे या समाजामध्ये विश्‍वासघात झाल्याची भावना निर्माण झाली असून शासनाला ‘क्या हुआ तेरा वादा’ असे प्रश्‍न जाहीररित्या जनता विचारू लागली आहे. त्यामुळे या समाजांना आश्‍वासन दिल्याप्रमाणे आरक्षण लागू करण्यात यावे.  खोट्या जाहिराती बंद करून जनतेच्या पैशाची बचत करावी, एलबीटी रद्द केल्यानंतर महानगरपालिकांना शासनाकडून वेळेवर व पुरेशी मदत न मिळाल्यामुळे नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे,  निवडणुकीवेळी रोजगारनिर्मिती, परवडणारी घरे, औद्योगिकरण, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, गरिबांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणे यापैकी एकाही आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने ‘अच्छे दिन’बाबत जनतेचा भ्रमनिरास झाला असून सरकारने  लेखाजोखा मांडावा, अशी मागणी शहराध्यक्ष भारत जाधव यांनी यावेळी बोलताना केली. शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. 

 यावेळी  कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, माजी महापौर सुभाष पाटणकर, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, माजी परिवहन सभापती मल्लेश बडगू, महिला निरीक्षक निर्मला बावीकर, प्रदेश सचिव वैशाली गुंड, महिला आघाडी शहराध्यक्ष सुनीता रोटे, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, विद्यार्थी शहराध्यक्ष निशांत सावळे, कार्याध्यक्ष सुहास कदम, सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सोशल मीडियाप्रमुख प्रमोद भोसले,  सिया मुलाणी, संगीता कांबळे, गौरा कोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या  संख्येने उपस्थित होते.