Thu, Jun 27, 2019 14:21होमपेज › Solapur › होमगार्ड युवतीवर बलात्कार

होमगार्ड युवतीवर बलात्कार

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 19 2018 10:47PMसोलापूर ः प्रतिनिधी

तुझ्याशीच लग्‍न करतो आणि ओळखीने पोलिस दलात भरती करण्याचे आमिष दाखवून एका पोलिसाने होमगार्ड युवतीचे वारंवार लैंगिक शोषण केले व तिच्यावर विविध ठिकठिकाणी नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी त्या पोलिसाविरुद्ध जोडभावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक शंकर यादूराव भिसे (रा. अरविंदधाम पोलिस वसाहत, मूळ रा. हिंगोली) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव असून, त्यास अटक करण्यात आली आहे. 

 भिसे याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 23 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक भीमाजी पाटील यांनी सांगितले. 

पोलिस नाईक शंकर भिसे याने नोव्हेंबर 2016 ते जुलै 2018 या कालावधीत अरविंदधाम पोलिस वसाहतीतील खोलीत, मोहोळ येथील सदिच्छा लॉज, बाळे येथील गंगासागर लॉज, सोलापूर बसस्टँड येथील लॉज येथे वेळोवेळी त्या महिला होमगार्ड तरुणीला नेले व तेथे तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. या तरुणीचे लग्नाच्या आमिषाने लैंगिक शोषण केल्यानंतर जानेवारी 2017 रोजी दुसर्‍याच मुलीबरोबर त्याने लग्नदेखील केले. त्यानंतरही आरोपीने होमगार्ड महिलेच्या मागे लागून वारंवार लैंगिक शोषण करत राहिला. तुला सोडणार नाही, तुझे लग्न कोठेही होऊ देणार नाही, तू जाशील तेथे मी येणार, तुझे लग्न ठरले तर मांडवात येऊन तुझे लग्न मोडणार, अशी धमकी दिल्याचे या पीडित तरुणीने आपल्या तक्रारअर्जात म्हटले आहे. 

पीडित युवती ही जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड येथे होमगार्ड म्हणून नोकरीस असताना सम्राट चौक पोलिस चौकीत नेमणुकीस असलेला आरोपी शंकर भिसे याची तिच्यासोबत ओळख झाली. या युवतीची बंदोबस्तावेळी सम्राट चौकातील पोलिस चौकीस ड्युटी नेमली होती. त्या भेटीतून या दोघांची जवळीक वाढली. चौकीच्या कामासाठी शंकर भिसेच्या मोबाईलवर, व्हॉट्सअ‍ॅपवर बोलणे वाढले. यातूनच पुढे संपर्क वाढला. त्यानंतर त्याने तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे सांगितले. तुझी माझ्या काकाच्या ओळखीने पोलिस दलात भरती करतो म्हणून सांगितले. नोव्हेंबर 2016 मध्ये दिवाळीच्या सणात शंकर भिसेने घर दाखवण्याचा बहाणा करुन अरविंद धाम येथील पोलिस वसाहतीत खोलीवर नेले. यावेळी तुझ्याशी लग्न करायचेच आहे म्हणून शरीरसुखाची मागणी केली. यास नकार देवून घरात मोठी असून आपले आयुष्य खराब होण्याची भीतीही पीडितेने बोलून दाखविली. तरीही त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. तथापि, आरोपीने पीडितेसोबत विवाह न करता दुसर्‍याच युवतीशी विवाह केला. विवाहानंतरदेखील तो पीडितेचे लैंगिक शोषण करतच होता. त्याला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.