Wed, Apr 24, 2019 01:30होमपेज › Solapur › अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन दहा लाखांची मागणी 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन दहा लाखांची मागणी 

Published On: Mar 22 2018 7:27PM | Last Updated: Mar 22 2018 7:26PMसोलापूर : प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार करुन नंतर लग्नासाठी दहा लाख रुपये मागितल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराबाबत सख्खे भाऊ आणि वडील अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिकंदर लाडेमशाक मुजावर, जावीद लाडेमशाक मुजावर आणि लाडेमशाक मुजावर (रा. जुना विजापूर नाका, चाँदतारा मशिदीजवळ, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन बलात्कार व बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील पीडित मुलीची ओळख जावीद मुजावर याच्याशी होती. त्याने पीडित मुलीला तुझ्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखवून पीडित मुलीशी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर जावीदचा भाऊ सिकंदर माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेव नाही तर तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी पीडित मुलीला देत होता. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री सिकंदर हा पीडित मुलीच्या आईकडे गेला व जोरजबरदस्ती केली. पीडितेच्या आईने नकार दिल्यावर तो पीडित मुलीकडे गेला व त्याने आईला मारुन टाकण्याची धमकी देऊन पीडितेवर बलात्कार केला व पळून गेला. 

त्यानंतर सिकंदरचे वडील लाडेमशाक हे पीडितेच्या घरी आले व त्यांनी माझ्या धाकट्या मुलाबरोबर जावीदबरोबर तुझे लग्न लावून देतो, तू काळजी करू नकोस असे सांगून निघून गेले. त्यानंतर सिकंदरचा भाऊ जावीद याने मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे म्हणून पीडितेशी अनेकवेळा शरीरसंबंध केले. काही दिवस झाल्यानंतर पीडित मुलगी लग्नाबाबत जावीदच्या पाठीमागे लागली. त्यावेळी त्याचे वडील लाडेमशाक यांनी पीडितेकडे लग्न करायचे असेल तर दहा लाख रुपये दे नाही तर लग्न होणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पीडित मुलीने याबाबत बलात्कार व बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार फिर्याद दाखल केली.

Tags : solapur, rape, Minor girl, ten lakh, crime