Wed, Jul 17, 2019 18:09होमपेज › Solapur › धनगर आरक्षणासाठी सरकारवर दबाब आणा : ना. राम शिंदे

धनगर आरक्षणासाठी सरकारवर दबाब आणा : ना. राम शिंदे

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 8:56PMसोलापूर : प्रतिनिधी

धनगर आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी धनगर समाजाने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाब आणावा, असे  आवाहन राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी लातूर येथे धनगर समाजाला केले.
धनगर साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित दुसर्‍या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी संगीता धायगुडे होत्या. ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धो. महानोर, जयसिंग शेंडगे, आमदार सुधाकर भालेराव, संजय सोनवणे, स्वागताध्यक्ष अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिंदे म्हणाले, केंद्राकडे दोन विसंगत अहवाल गेल्याने आरक्षणाला खीळ बसली. आता पुन्हा हा अहवाल जाणार आहे. त्यावेळी तरी असे होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 

आरक्षण लागू झालेच पाहिजे व ते मिळवण्यासाठी सरकारवर दबाब आणण्याची जबाबदारी समाज व समाजाच्या संघटनांची आहे. गेल्या सत्तर वर्षात जे केले गेले नाही, ते विधायक काम विद्यमान सरकारने केल्याचे ते म्हणाले. सोलापूर विद्यापीठाला शासनाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी उपसमितीही गठीत करण्यात आली आहे. 

कोणताही वाद वा संघर्ष न होऊ देता शासन हे नामकरण करणार आहे, त्याला भलेही विलंब लागेल. तो निर्णय सरकारचा असल्याने प्रत्यक्षात येईल. तो येईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असेही शिंदे म्हणाले. साहित्य परिषदेच्या व साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन होत असलेले समाज संघटन व संघटनशक्ती याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करुन धनगर साहित्य अभ्यासावे, असे आवाहन 
केले.