Mon, Apr 22, 2019 23:39होमपेज › Solapur › बडे मासे गळाला लावण्यासाठी खा. शेट्टी प्रयत्नशील

बडे मासे गळाला लावण्यासाठी खा. शेट्टी प्रयत्नशील

Published On: Dec 13 2017 1:48AM | Last Updated: Dec 12 2017 10:23PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन खा. राजू शेट्टी यांनी आपली राजकीय पत अबाधित राखण्याच्या हेतूने सोलापूर जिल्ह्यात नव्याने बांधणी सुरू केली आहे. विद्यमान पदाधिकार्‍यांच्या मर्यादा लक्षात घेऊन खा. शेट्टींनी पुन्हा एकदा जिल्ह्यातील बड्या माश्यांना गळ टाकायला सुरुवात केली असून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेतील तालुका पातळीवर चांगला प्रभाव असलेले नेते शेट्टींच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे ऊस दराच्या आंदोलनाकडे पाठ फिरवलेले खा. शेट्टी आता लग्नसमारंभासाठीही सोलापूर जिल्ह्यात येऊ लागले आहे. 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोलापूर जिल्ह्यात विशेषत: माढा लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद निर्माण झालेली आहे. मागील लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानीचे उमेदवार सदाभाऊ खोत येथून अगदी निसटत्या मतांनी पराभूत झाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतीही स्वाभिमानीच्या साखर कारखानदार उमेदवारांनी विजयाच्या उंबरठ्याला धडका मारल्या; मात्र तिथेही थोडक्यात अपयश आले. 

दरम्यानच्या काळात स्वाभिमानीत फाटाफूट होऊन सदाभाऊ खोत बाहेर पडले. माळशिरस तालुक्यातील मोठे नेते उत्तमराव जानकर भाजपात गेले. संजय शिंदे, प्रशांत परिचारक यांच्यासारखे विधानसभेचे उमेदवार असलेले नेते आता भाजपच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा नव्याने बांधणी करावी लागली आहे.
ऊसदराचे आंदोलन हेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भांडवल असून यंदाच्या गाळप हंगामात     स्वाभिमानीला या आंदोलनात फारसे यश मिळालेले नाही. साखर कारखानदारांना आपल्या ताकदीवर वाकवण्यात जिल्ह्यातील नूतन पदाधिकार्‍यांना अपयश आले आहे. त्यामुळे खा. शेट्टींनी संघटनेची नव्याने बांधणी करण्याचा निर्धार केल्याचे दिसते. त्यातूनच त्यांचे सोलापूर जिल्ह्यात विशेषत: माढा लोकसभा मतदारसंघातील दौरे वाढले आहेत. साखर कारखानदार  वगळता राजकीय क्षेत्रातीलच किमान तालुका पातळीवर चांगला प्रभाव असलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना संघटनेत येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यात शेट्टींचे विशेष प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहेत. खोत यांच्याशी फारकत घेतल्यानंतर शेट्टी सक्रिय झाले आहेत.