Tue, Mar 19, 2019 03:11होमपेज › Solapur › अपहरणप्रकरणी दोघे आरोपी अटकेत

अपहरणप्रकरणी दोघे आरोपी अटकेत

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 9:05PMमोहोळ : वार्ताहर

येवती (ता. मोहोळ) येथून 1 जुलै रोजी अपहरण झालेले राजेंद्र बिसरे यांना शोधण्यात मोहोळ पोलिसांना यश आले. पंढरपूर तालुक्यातील विटे येथील छाया परकाळे आणि नारायण परकाळे यांच्या तावडीतून मंगळवारी मोहोळ पोलिसांनी त्यांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी वरील दोघांना अटक करुन गजाआड केले आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 1 जुलै रोजी राजेंद्र बेसरे यांचे येवती येथून अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी 2 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अपहरण करणार्‍या आरोपींपैकी नितीन बेसरे यास पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तर आण्णा बेसरे हा अद्यापही फरार आहे. दरम्यान, अपहरण झाल्यानंतर राजेंद्र बेसरे हे विटे (ता. पंढरपूर) येथील नारायण परकाळे आणि छाया परकाळे यांच्या तावडीत असल्याची माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सपोनि डॉ. नितीन थेटे यांचे पथक रवाना केले. यावेळी पोलिसांनी नारायण परकाळे आणि छाया परकाळे यांना अटक करुन त्यांच्या तावडीतून राजेंद्र बेसरे यांची सुटका केली. 

फरार असलेला आरोपी आण्णा बेसरे याची पत्नी अंजली बेसरे यांचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या 5 इतकी झाली आहे. मात्र आरोपींनी या गुन्ह्यात कोणते वाहन वापरले आहे? त्या वाहनाचा चालक कोण होता? तसेच अपहरण झाल्यानंतर राजेंद्र यांना कुठे ठेवण्यात आले होते? याबाबतचा तपास करणे बाकी आहे.

दरम्यान, यापूर्वी अटकेत असलेला आरोपी नितीन बेसरे तसेच छाया परकाळे, नारायण परकाळे यांना पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यातील फरार आरोपी आण्णा बेसरे आणि अंजली बेसरे यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. तपास सपोनि डॉ. नितीन थेटे हे करीत आहेत.