Sun, May 19, 2019 22:29होमपेज › Solapur › राईनपाडा हत्याकांडाच्या निमित्ताने...मलमपट्टीऐवजी ठोस उपाय आवश्यक

राईनपाडा हत्याकांडाच्या निमित्ताने...मलमपट्टीऐवजी ठोस उपाय आवश्यक

Published On: Jul 09 2018 1:08AM | Last Updated: Jul 08 2018 8:29PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील चौघांवर मुले पळवणारी टोळी समजून अमानूष अत्याचार आणि पाशवी मारहाण केल्याने  मृत्यूमुखी पडलेल्या नाथपंथी डवरी समाजातील दादाराव भोसले, भारत माळवे, भारत भोसले या खवे गावातील तर मानेवाडी येथील आप्पा इंगोले या उमद्या तरुणांच्या जाण्याने त्या कुटुंबाचे अपरिमित नुकसान झाले आहे. गेलेले पुन्हा येणार नाहीत मात्र सध्या राजकीय सांत्वन स्पर्धा सुरु झाली आहे. निवडणुका जवळ येत आहेत. याचा इव्हेंट करत प्रत्येक जण आर्थिक मदत देत आहेत. आता पर्यंत जवळ जवळ दहा जणांनी  कमी अधिक प्रमाणात अर्थिक मदत दिली.   ही मदत या कुटुंबीयांना दिलासा देणारी असली तरी तात्पुरती मलमपट्टी ठरण्याचा अधिक धोका आहे. त्यामुळे या भटक्या समाजाला स्थीर स्थावर करण्यासाठी ठोस मदत आवश्यक  आहे.

सामाजिक, राजकीय, प्रशासकीय पातळीवर गंभीर दखल घेतलेले हे दिवस निघून जातील. मात्र त्यानंतर  तालुक्यातील कचरेवाडी, शेलेवाडी, गणेशवाडी, पाठखळ, खुपसंगी, जुनोनी, नंदेश्‍वर महमदाबाद हु. मानेवाडी, हुन्नुर, लवंगी, निंबोणी, खवे, जित्ती, शिरनांदगी, रेवेवाडी या गावात मोठ्या प्रमाणात  असलेल्या या समाजातील लोकांना परत भिक्षा मागत हिंडावे लागणार  आहे. सद्या मिळणारी अर्थिक मदत ही कायमस्वरूपीचा पर्याय नाही. त्यामुळे या समाजाची भटकंती थांबवण्याकरिता ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी अवश्यक असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षांपासून देशभरात विविध ठिकाणी भिक्षा मागण्यांसाठी ते फिरत आहेत. मात्र  राईनपाडा येथील  घटना घडल्याने त्यांच्यामध्ये भीती आणि घबराट निर्माण झाली.

फिरून पोठाची खळगी भरणार्‍या या समाजाला आता चिंता निर्माण झाली आहे. उदरनिर्वाहासाठी तुटपूंजी मदत पुरेसी ठरणार नाही.  त्यामुळे या समाजाचे  कायमस्वरुपी पुर्नवसन होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाथपंथी डवरी-गोसावी समाजाला 10 टक्के आरक्षण देवून एस. सी., एस. टी च्या सवलती मिळाल्या पाहिजेत. त्या शिवाय याना स्थैर्य मिळणार नाही असे विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. मात्र यासाठी खरोखर प्रयत्न पण केले पाहिजेत. मिळणार्‍या आर्थिक रकमा ह्या त्या कुटुंबियांच्या कलहाचे कारण होऊ शकणार आहे. मयत कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी त्या विधवा महिलांना आरोग्य विभागात किंवा समाजकल्याण विभागात पात्रते नुसार सेवेत सामावून घेणे गरजेचे आहे. दादाराव भोसले चे लग्न तीन वर्षापुर्वी झाले.

त्यांच्या विधवा पत्नीला अपत्य नाही संपूर्ण आयुष्य एकटी जगण्यासाठी सक्षम आधार आवश्यक आहे. मानेवाड़ी चा आप्पा इंगोले हा उमदा होता. त्याच्या मागे आई आणि लहान भाऊ आहे. लहान भावाच्य शिक्षणाची जबाबदारी तालुक्यातील साळे यांनी स्वीकारली. मात्र कुटुंबाच्या भविष्याच काय हा प्रश्‍न आहेच नाथजोगी समाजात परिवर्तन घडवून. शिक्षण आणि व्यवसायासाठी शासकीय मदतीची या समाजाला नितांत गरज आहे. मात्र यासाठी खरोखर प्रयत्न पण केले पाहिजेत. स्वतंत्र महामंडळ किंवा समाजाच्या उभारणीसाठी शासन स्तरावर त्याना शिक्षण नोकरी व्यवसाय शेती यात सवलती दिल्या शिवाय हा भटकंती भोग संपूष्ठात येणार नाही असेही बोलले जात आहे.