Tue, May 21, 2019 12:24होमपेज › Solapur › करमाळा परिसरात भिज पावसाला सुरुवात

करमाळा परिसरात भिज पावसाला सुरुवात

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:39PMकरमाळा : प्रतिनिधी

करमाळा शहर व तालुका परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून भिज पावसाला सुरूवात झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. सतत पडणार्‍या भिज पावसामुळे या परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांना सूर्यदर्शन झालेले नाही.

करमाळा शहर व तालुका परिसरामध्ये 118 गावांचा समावेश असून या परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारलेली होती. काही शेतकर्‍यांनी आपल्या छातीवर दगड ठेऊन खरीप हंगामाची पेर कोरड्या जमिनीवर केलेली होती. पाऊस पडेल, या आशेवर लाखमोलाचे बी मातीमध्ये पेरण्याचे काम शेतकर्‍यांनी केलेले होते. मात्र, तब्बल दोन महिन्यांपासून पावसाने या परिसराकडे पाठ फिरवल्यामुळे या भागातील शेतकरी चिंतामग्न होता. खरीप पूर्णपणे वाया गेले. आता रब्बीला सुध्दा पाऊस पडणार की नाही? अशी चिंता शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत असताना या गोष्टीचा विपरीत परिणाम बाजारपेठेवर सुध्दा झालेला होता. शेतकर्‍यांच्या हातावर चार पैसे येत नसल्यामुळे या भागातील शेतकरी बाजारपेठेकडे फिरकत नव्हता. 

श्रावणातील पंचमी पावसाविना गेल्यामुळे पंचमीच्या सणावर दुष्काळाचे सावट जाणवत होते. अशा परिस्थितीमध्ये बुधवार दिवसभर रिमझिम पाऊस सुरू झाल्याने शेतकरी थोडा आशादायी बनला होता. तर गुरूवार दिवसभर रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.

खरीप वाया गेले, आता सर्व वर्षभरातील मदार रब्बीच्या हंगामावर अवलंबून असल्यामुळे सध्या सुरू असलेला भिज पाऊस अशाच प्रकारे सुरू रहावा, अशी अपेक्षा शेतकरी करताना दिसत आहेत. सध्या पडत असलेल्या भिज पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.