होमपेज › Solapur › पतीकडून पत्नी, मुलीचा निर्घृण खून

पतीकडून पत्नी, मुलीचा निर्घृण खून

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:42PM

बुकमार्क करा

रड्डे : वार्ताहर

सिद्धनकेरी (ता. मंगळवेढा)  येथे एका तरुण नराधमाने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा पहारीने ठेचून, तर एक वर्षाच्या चिमुकलीचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना रविवारी रात्री घडल्याने खळबळ उडाली आहे.

सिद्धनकेरी  येथील संजय नागाप्पा कोरे (वय 35) याने रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून जेवण करत असलेली  पत्नी सुरेखा (वय 32) व मुलगी श्रावणी (वय 1 वर्ष) या दोघींचा निर्घृणपणे खून केला. पत्नी व मुलगी रात्रीचे जेवण करीत ताटावर बसल्या होत्या. त्यावेळी अचानक संजय कोरे याने पत्नीच्या डोक्यात घरातील पहारीने घाव घालून खून केला. पहारीच्या घावाने सुरेखा जागीच मृत झाली. सुरेखाचा चेहरा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. तर जवळच बसलेली मुलगी श्रावणीचाही आरोपी संजयने गळा दाबून निर्दयीपणे खून केला. यानंतर संजयने घरात असलेली मांजराची 3 पिलेही त्याच पहारीने  मारून टाकली.

सिद्धनकेरी गावापासून सुपनर वस्ती रोडवर साधारण दीड कि.मी. अंतरावर त्याची वस्ती असून हे कृत्य केल्यानंतर तो गावात गेला व लोकांना आपण केलेले कृत्य सांगू लागला. यानंतर गावातील काही तरुणांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांना फोन केला. सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी वस्तीवर जाऊन पाहणी करून आरोपी संजय कोरे याला ताब्यात घेतले. ही घटना समजताच मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

संजयचे वडील नागाप्पा कोरे व आई शारदा हे दोघे संजयची मोठी मुलगी श्रेया हिस घेऊन बाहेरगावी गेल्याने श्रेया  आपल्या क्रूरकर्म्या पित्याच्या हातून वाचली आहे; मात्र निष्पाप श्रावणीचा मृतदेह पाहून सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू ढळत होते. संजय कोरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.