Fri, Jan 18, 2019 21:16होमपेज › Solapur › पुरुंदावडेत अपघात; माय-लेक ठार

पुरुंदावडेत अपघात; माय-लेक ठार

Published On: May 28 2018 1:31AM | Last Updated: May 27 2018 10:01PMमाळशिरस : तालुका प्रतिनिधी

पुरुंदावडे (ता. माळशिरस) नजीक टाटा सफारी व मोटारसायकल यांच्यात समोरा-समोर झालेल्या धडकेत मोटार सायकलवरील माय-लेक ठार झाल्याची दुर्घटना रविवारी घडली. आशाबाई महादेव काळे (वय 55) व मुलगा राजेंद्र महादेव काळे (35, दोघेही रा. वेळापूर) अशी मृतांची नावे आहेत.

राजेंद्र काळे हा आई आशाबाई काळे यांच्यासमवेत मोटारसायकलवरून वेळापूरहून मांडवे गावाकडे निघाले होते. पुरुंदावडे बस स्थानकानजीक समोरून येणार्‍या वाहनाच्या पुढे जाण्याचा  प्रयत्न करीत असलेल्या टाटा सफारी कार  यांची समोरा-समोर जोरात धडक झाली. यामध्ये मोटारसायकलवरील दोघेही उंच उडून रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. त्यामुळे ते जागीच ठार झाले. सफारी कारमधील प्रवाशीही किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात  मोटारसायकलचा चुराडा झाला, तर सफारीचा पुढचा भाग पूर्णत: चेपला गेला. ती रस्त्यापासून सुमारे 15 फूट लांब जाऊन थांबली.

या अपघातातील मृत झालेल्या काळे कुटुंबाचा वेळापूरनजीक इको बोर्ड कंपनीसमोर हॉटेलचा व्यवसाय असून, मृत राजेंद्र यास पत्नी व दोन मुले आहेत. ही दुर्घटना वेळापूर परिसरात समजताच काळे कुटुंबाच्या नातेवाईकांसह नागरिकांनी माळशिरस ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. माय-लेकाचा अशा तर्‍हेने अंत झाल्याने या अपघाताबाबत दिलीप संभाजी काळभोर (रा. मेडद) यांनी माळशिरस पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.