Thu, May 23, 2019 04:18होमपेज › Solapur › दै. पुढारीचे ९९ वर्षांचे वाचक आजोबा

दै. पुढारीचे ९९ वर्षांचे वाचक आजोबा

Published On: Jan 27 2018 2:35PM | Last Updated: Jan 27 2018 2:35PMपंढरपूर : प्रतिनिधी

वयाच्या शंभरीच्या उंबरठ्यावर उभा असलेले वयोवृद्ध आणि सेवानिवृत्त गुरुजी आजही चष्मा न वापरता वाचन करतात. विशेष म्हणजे दै पुढारी हे त्यांचे आवडते वर्तमानपत्र असून ते पुढारीचे नेहमीचे वाचक आहेत.

वाखरी ( ता. पंढरपूर ) येथील शंकर गणपत पोरे असे या गुरुजींचे वय असून 99 वर्षे पूर्ण करीत शतकाकडे वाटचाल करीत आहेत. १९७८ साली सेवानिवृत्त झालेले गुरुजी आजही चष्मा न लावता वर्तमानपत्र वाचत असतात. काठीच्या अधाराशिवाय चालतात, फिरतात. त्यांची स्‍मरणशक्‍ती आजही तितकीच तल्‍लख अून ते अनेक वर्षांनी भेटलेल्या माणसाला पाहिल्याबरोबर ओळखतात. क्रीडा प्रेमी असलेल्या शंकर पोरे गुरुजींचा क्रिकेट हा आवडता खेळ असून क्रिकेटच्या बातम्या ते प्राधान्याने वाचतात. भारतीय संघाचा क्रिकेटचा सामना सुरू असला की, गुरुजी टीव्‍हीसमोर ठाण मांडून बसतात आणि नातवंडे, पतवंडे यांच्यासोबत क्रिकेटचा आस्वाद घेतात. गुरुजींच्या या वयातील उत्तम आरोग्य, ठणठणीत प्रकृतीचे आणि स्पष्ट नजरेचे, त्यांच्या वाचन आणि क्रीडा प्रेमाचे वाखरी परिसरात कौतुक होत असते.