Wed, Mar 20, 2019 22:55होमपेज › Solapur › नळदुर्गला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीत अज्ञाताने शौच केल्याने संताप

नळदुर्गला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीत अज्ञाताने शौच केल्याने संताप

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 04 2018 9:17PMनळदुर्ग : प्रतिनिधी

शहरातील जुन्या भागात पाणीपुरवठा करण्यात येणार्‍या हुतात्मा निलय्या स्वामी उद्यानातील मुख्य जलवाहिनीत मंगळवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने शौच केल्याने शहरवासियात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी बुधवार रोजी दिवसभर सोशल मीडियावरुन अनेकांनी या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध केला. शहरातील हजारो नागरिकांच्या आरोग्याचा व जीविताचा प्रश्‍न असल्यामुळे नगरपालिका कर्मचार्‍यांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी व्यंकटेश नगर येथील जलवाहिनी अज्ञात समाजकंटकाकडून फोडण्यात आली होती. असे कृत्य करणार्‍या अज्ञात समाजकंटकावर कारवाई करण्यासाठी पाणीपुरवठा विभाग कर्मचार्‍यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, बुधवारी पाणीपुरवठ्याचे कर्मचारी जनार्धन कांबळे, फुलचंद सुरवसे, अंबादास व्हगाडे, विष्णू भोई, मुनीर शेख, योगेश बनसोडे, संजय कांबळे, संदिपान कांबळे, विकास कांबळे, दीपक कौरव आदी कर्मचार्‍यांनी पाण्याची दोन लाख लिटर क्षमता असलेल्या स्टोरेज टँकची स्वच्छता केली. तब्बल सात तास कर्मचारी स्वच्छता करीत होते. घटनास्थळी पाणीपुरवठा सभापती महालिंग स्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, पाणीपुरवठा करणार्‍या हुतात्मा निलय्या स्वामी उद्यानात भविष्यात अनुचित घटना घडू नये, यासाठी न.प. प्रशासनाने कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. त्याचबरोबर स्वामी उद्यानातून गेलेला रस्ता तात्काळ बंद करण्याची मागणी होत आहे.