Tue, Jul 16, 2019 13:37होमपेज › Solapur › मानसिक रूग्ण महिलेचा विहिरीत पडून मृत्‍यू

मानसिक रूग्ण महिलेचा विहिरीत पडून मृत्‍यू

Published On: Feb 06 2018 8:30PM | Last Updated: Feb 06 2018 8:30PM मोहोळ: प्रतिनिधी 

मानसिक रूग्ण असलेल्या व घरातून निघून गेलेल्या ५० वर्षीय महिलेचा विहीरीत पडल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सुमन नामदेव गायकवाड (रा. पेनूर, ता. मोहोळ) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना पेनूर गावच्या शिवारात घडली असून मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आली. त्यामुळे पेनूर परिसरात एकच खळबळ उडाली.

याबाबत मोहोळ पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पेनूर (ता. मोहोळ) येथील सुमन नामदेव गायकवाड ही वेडसर महिला सोमवारी दुपारपासून वेडाच्या भरात घरातून बाहेर गेली होती. तेव्हापासून त्यांचा मुलगा सुभाष गायकवाड त्यांना शोधत होता मात्र त्या सापडत नव्हत्या.

मंगळवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास पेनूर - येवती रस्त्यालगत असणाऱ्या हणमंत रघुनाथ माळी यांच्या शेतातील विहीरीवर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे आईच्या शोधात आलेल्या सुभाष गायकवाड यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले. त्यावेळी सुमन गायकवाड यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे पाहून एकच आक्रोश केला.

दरम्यान विहीरीचे मालक हणमंत माळी यांचा मुलगा दादाराव माळी हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे विहीरीवर गेले होते. त्यावेळी त्यांना अज्ञात महिलेचे प्रेत पाण्यावर पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले होते. घटनेची माहिती मिळताच मोहोळचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बडाख, पो.ना. कोळी, पो.कॉ. दत्तात्रय वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी पोलीसांनी सदर विहीरीला पायऱ्या नसल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाज आणि दोरीच्या सहाय्याने मृत सुमन यांचे प्रेत बाहेर काढले. यावेळी पोलीसांनी घटनास्थळाचा रितसरपंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला.

याबाबत सुभाष गायकवाड यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.मोहोळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.