Sun, Mar 24, 2019 22:57
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › लढवय्या सोलापूरकरांकडून संयमाचे दर्शन

लढवय्या सोलापूरकरांकडून संयमाचे दर्शन

Published On: Jul 26 2018 1:40AM | Last Updated: Jul 25 2018 8:53PMसोलापूर : दीपक होमकर 

‘मार्शल लॉ’सारख्या जुलमी कायद्याविरोधात लढणारे सोलापूरकर देशात सर्वात प्रथम ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकत चार दिवस सर्वात आधी स्वातंत्र्य मिळवून दाखविणारे सोलापूरकर, वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी सरकारला नमविणारे सोलापूरकर, लाल क्रांतीतून जन्माला आलेल्या माकप विचारांचा आमदार दोन टर्म निवडून देणारे सोलापूरकर, लढवय्या बाणा सोलापूरकरांच्या रक्‍तातच भिनला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चात तो मागे कसा राहील. मात्र जसा लढवय्या बाणा रक्‍ताच्या थेंबाथेंबात भिनला आहे तशीच संतांची भूमी अशी दुसरी ओळखही सोलापूरचीच. त्यामुळे त्या संतांच्या संयमाची शिकवणही सोलापूरकरांच्या हाडामांसात भिनली आहे. या लढवय्या बाण्याची आणि संयमी वृत्तीचे दर्शन पुन्हा एकदा महाराष्ट्र अनुभवतोय, ते मराठा आंदोलनाच्या निमित्ताने.

मूक मोर्चावेळी   सोलापुरात  विक्रमी संख्या होती. चक्‍काजाम आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सरकार व पोलिस प्रशासनाला कार्यकर्त्यांनी घाम फोडला. जिल्ह्याभरात तीस एसटी बसेस आंदोलकांनी फोडल्या. मात्र पंढरपूरच्या वारकर्‍यांच्या सुरक्षिततेचे राजकारण करण्यास सुरुवात झाल्यावर आंदोलकांनी वारकर्‍यांच्या संयमाची भूमिका घेतली. काकासाहेब शिंदे हे मराठा आंदोलनात पहिले हुतात्मा ठरल्यानंतर सारा महाराष्ट्र पेटून उठला.  राज्यभरातल्या एसटी बसेसच्या फेर्‍या या आंदोलनात मंदावल्या, तर मुंबईच्या धमन्या मानल्या जाणार्‍या अनेक लोकल आंदोलकांनी रोखून धरल्या. मात्र वारीनिमित्ताने दहा लाखांवर भाविक सोलापुरातील पंढरीत आल्यामुळे त्यांना सुखरुप घरी परतण्यासाठी गेल्या दोन दिवसांत एसटीला, रेल्वेला लक्ष्य केले नाही. वारकरी सुखरुप घरी पोहोचताच सोलापूरचे मावळे पुन्हा त्यांचा लढवय्या बाणा दाखविण्यास सज्ज झाले आहेत.  

मात्र जोपर्यंत वारकरी पंढरपुरात आहेत आणि घरी जाण्यासाठी सोलापूर शहरातील एसटी बसस्थानक, रेल्वेस्थानकावर आहेत तोपर्यंत आंदोलनाचा भडका उडू द्यायचा नाही, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे सोलापुरातील आंदोलनकर्ते केवळ शिवाजींचे मावळेच नाहीत, तर संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्याचे खरे वारसदार असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.