होमपेज › Solapur › दिव्यांग संघातर्फे विराट मोर्चा

दिव्यांग संघातर्फे विराट मोर्चा

Published On: Mar 14 2018 10:08PM | Last Updated: Mar 14 2018 10:04PMसोलापूर : प्रतिनिधी  

राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीने अंधांच्या (दिव्यांग)विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.

जिल्हा परिषद आणि सोलापूर महानगरपालिकेच्या स्थानिक निधीतील तीन टक्के रक्‍कम अंध आणि अपंगांसाठी खर्च करावी, अपंग व्यक्‍ती अधिनियम 1995 नुसार स्थापन केलेल्या जिल्हा समन्वय व सल्लागार समितीचे पुनर्गठण होऊन संघाच्या प्रतिनिधीत अंध प्रवर्गातील प्रतिनिधी म्हणून स्थान मिळावे, अपंगांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारे अनुदान किमान दोन हजार रुपये करावे, जिल्हाधिकारी कार्यालय नगरपालिका व नगर पंचायतीतील अपंग अनुशेष पदोन्‍नतीने तत्काळ भरावा, अपंगांना विनाअट अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्यावा, अनुसूचित जातीच्या शेतमजुरांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत जमीन वाटप करण्यात यावी, शासकीय कार्यालयाच्या आवारात अंध- अपंगांना व्यवसायाकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशा विविध 19 मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले. चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. याविषयी शासनाने जाणिवपूर्वक विचार करावा अन्यथा यापेक्षा मोठा मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेच्या वतीने राजू शेळके यांनी दिला आहे.