होमपेज › Solapur › अक्‍कलकोट, बार्शी येथे धनगर समाजाचे तीव्र आंदोलन

अक्‍कलकोट, बार्शी येथे धनगर समाजाचे तीव्र आंदोलन

Published On: Aug 15 2018 1:27AM | Last Updated: Aug 14 2018 10:42PMअक्कलकोट : वार्ताहर

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी  अक्‍कलकोट शहरात धनगर समाजाच्यावतीने सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

फत्तेसिंह चौक येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन धनगर समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय हिळ्ळी यांच्या हस्ते करुन आंदोलनास सुरुवात झाली. धनगर समाज संघटनेचे युवक अध्यक्ष तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅली व पायी मोर्चाद्वारे राजे फत्तेसिंह चौक, तूप चौक, कारंजा चौक, ए-वन चौक, मंगरुळे चौकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर रोड अक्कलकोट ते सोलापूर या महामार्गावर शेळ्या व मेंढ्यांसह हजारो बांधवांनी  चक्काजाम आंदोलन केले. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

याप्रसंगी सोलापूरचे नगरसेवक चेतन नरोटे, सोलापूर बाजार समितीचे नूतन संचालक बाळासाहेब शेळके, दोड्डीचे सरपंच महेश पाटील, संतोष वाकसे, निमिषा वाघमोडे, राष्ट्रवादीचे दिलीप सिद्धे, रिपाइंचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, जिल्हा सरचिटणीस राहुल रुही, आप्पा भालेराव, दत्तात्रय माडकर, विकी चौधरी, शेखर भंगाळे, महेश जानकर, निलप्पा घोडके, स्वामीनाथ घोडके, अनिता घोडके, सिद्राम आलुरकर, सुभाष पुजारी, पुंडलिक पांढरे, औदुंबर बंडगर, सूर्यकांत बाचके, रवी सलगरे, गुणवंत लवटे, अनिल बर्वे, राम मदने, मारुती सोनकर, दरेप्पा पुजारी, उमेश पांढरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चक्काजाम आंदोलनप्रसंगी तहसीलदार दीपक वजाळे यांनी स्वतः येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी चेतन नरोटे,  सुनील  बंडगर, दत्तात्रय हिळ्ळी, शंकर व्हनमाने, अविनाश मडीखांबे, दिलीप सिद्धे, महेश जानकर, विकी चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बार्शी : तालुका प्रतिनिधी 

बार्शीत  धनगर समाजबांधवांतर्फे धनगर आरक्षणासंदर्भात मंगळवारी मोर्चा काढून तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ढोल, पारंपरिक वाद्ये, खांद्यावर घोंगडी यासह पारंपरिक पोषाखात धनगरबांधवांनी मोर्चात सहभाग घेतला होता.  मागण्यांचे निवेदन तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी स्वीकारले.  धनगर जमातीस अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र द्यावेे, बार्शी तालुक्यात धनगर व धनगड या दोन्ही जमाती एकच आहे असे लेखी पत्र देण्यात यावे, बार्शी तालुक्यामध्ये धनगड जमातीचे एकही कुटुंब व एकही व्यक्ती नाही, असे लेखी द्यावे व आमच्या मागण्या वरिष्ठांकडे देऊन आम्हाला न्याय द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

प्रमोद वाघमोडे, नाना देवकर, शीतल पाटील, नवनाथ गाडेकर, अरूण वैद्य, जीवन गावडे, राजाभाऊ पैकैकर, सुभाष शेळके, बबन गडदे, अरूण येळे, बापू सावंत, अमोल वायकुळे, बापू सावंत, अण्णा शेंडगे, लक्ष्मण पाटील, राहुल शेंडगे, दत्ता देवकर, बजरंग नरूटे, बापू घाटुळे यांच्यासह सकल धनगर समाजबांधवांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

यावेळी बार्शी शहर व जिल्ह्यातील विविध गावांतील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.