होमपेज › Solapur › कारागृहात कैदीच धावला अधीक्षकांच्या अंगावर

कारागृहात कैदीच धावला अधीक्षकांच्या अंगावर

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 9:09PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

कारागृह अधीक्षकांशी त्यांच्याच कार्यालयात वाद घालून त्यांना मारण्यासाठी धावून जाणार्‍या कैद्याविरुध्द जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सचिन उत्तम महाजन (वय 30, रा. माळशिरस, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत कारागृहातील कर्मचारी राकेश शिवाजीराव पवार (वय 37, रा. जिल्हा कारागृह वसाहत, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

2 जानेवारी रोजी रात्री जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सचिन महाजन (बंदी क्र. 87/2018) याने मला वेगळ्या बराकमध्ये न ठेवता इतर बंद्यांसोबत ठेवा अशी मागणी करुन बंदी होण्यासाठी नकार दिला होता. त्यावेळी कारागृह अधीक्षक संजय कुलकर्णी यांनी त्यास समजावून सांगितले. परंतु त्याने काहीही न ऐकता कुलकर्णी यांच्याशी वाद घातला होता. तेव्हा त्यास इतर बंद्यांसोबत बराक क्र. 2 मध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर अधीक्षक कुलकर्णी यांनी सोलापूर कारागृहात बंद्यांची संख्या जास्त असल्याने सचिन महाजन यास माळशिरस येथील सबजेलला वर्ग करावे, असा अहवाल माळशिरस न्यायालयास दिला होता. 

4 जानेवारी रोजी सचिन महाजन याची माळशिरस न्यायालयात तारीख असल्याने सकाळी 9 च्या सुमारास त्यास सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयाकडील पोलिस पथक माळशिरस येथे नेण्यासाठी आले होते. त्यावेळी गेटवर आलेल्या सचिन महाजन याने गेटकिपर असलेल्या राकेश पवार यांना अधीक्षकांना भेटविण्यासाठी सांगितले. त्यानुसार महाजन यास अधीक्षक कुलकर्णी यांच्या कार्यालयात नेले असता महाजन याने कुलकर्णी यांना मला जर तुम्ही येरवडा येथे पाठवत असाल तर मी माळशिरस येथील अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश जेलमध्ये येईपर्यंत येथून हलणार नाही असे म्हणून कुलकर्णी यांच्याशी वाद घालू लागला. मला कोणी हात लावला तर मी अधीक्षकांना मारहाण करीन असे म्हणाल्यानंतर अधीक्षकांनी त्यास माळशिरस सबजेल येथे वर्ग करण्याबाबतचा अहवाल दाखविला. तेव्हा महाजन याने तो अहवाल वाचून  फाडला. त्यावेळी जेलमधील कर्मचार्‍यांनी त्यास पकडून कार्यालयाच्या बाहेर घेऊन जात असताना अधीक्षकांच्या अंगावर मारहाण करण्यासाठी धावून गेला व पवार यांच्या शर्टाची कॉलर फाडली म्हणून पवार यांच्या फिर्यादीवरुन जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.