Wed, Apr 24, 2019 21:27होमपेज › Solapur › 'सोलापुरातील कामगार रुग्णालयात औषध पुरवठा, रिक्त पद तातडीने भरा'

'सोलापुरातील कामगार रुग्णालयात औषध पुरवठा, रिक्त पद तातडीने भरा'

Published On: Jun 04 2018 8:29PM | Last Updated: Jun 04 2018 8:29PMमुंबई : प्रतिनिधी

सोलापूर येथील कामगार रुग्णालयात (इएसआय) औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात यावा. या रुग्णालयाला मागणीनुसार तातडीने औषधे उपलब्ध करुन देण्यात यावीत, तसेच या रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

राज्यमंत्री देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात या रुग्णालयाच्या विविध अडचणीसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, संचालक डॉ. राजेश स्वामी, वैद्यकीय अधिक्षक डॉ कुनगुलवार आदी उपस्थित होते.

यावेळी सोलापूर येथील कामगार रुग्णालयाच्या कामकाजाबाबत देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन कामकाजात सुधारणा करण्याच्या सक्त सूचना दिल्या व सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करण्याचे देखील संकेत दिले.

राज्यमंत्री देशमुख यावेळी म्हणाले, कामगार रुग्णालय हे सोलापूर शहराच्या दृष्टीने एक महत्वाचे रुग्णालय आहे. शहरात कापड आणि विडी उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच शहरात इतर उद्योगही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसह इतर नागरिकांनाही कामगार रुग्णालयाचा मोठा लाभ होतो पण या रुग्णालयात कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच या रुग्णालयात औषधेही वेळेवर उपलब्ध होत नाहीत अशी नागरिकांची तक्रार आहे. तेव्हा आरोग्य विभागाने प्राधान्याने लक्ष घालून कामगार रुग्णालयातील या तक्रारी तातडीने सोडवाव्यात. रुग्णालयात औषधांचा पुरेसासाठा उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव असल्याच्याही अनेक तक्रारी आहेत. याविषयीही राज्यमंत्री देशमुख यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली व रुग्णालयात स्वच्छतेची व्यवस्था करुन रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले.