Wed, Mar 20, 2019 08:33होमपेज › Solapur › कष्‍टाचे झाले सोने, बैलाची किंमत अडीच लाख रूपये 

कष्‍टाचे झाले सोने, बैलाची किंमत अडीच लाख रूपये 

Published On: Dec 08 2017 1:12PM | Last Updated: Dec 08 2017 1:12PM

बुकमार्क करा

मोहोळ : प्रतिनिधी

शेतीचा शोध लागला अन मानव पाणवठ्याजवळ वस्ती करून राहू लागला खरा, मात्र या शेती व्यवसायात त्याला मोठ्या ताकदीची आवश्यकता भासू लागली. शेतीमधील विविध अंगमेहनतीच्या कामात खरी साथ लाभली ती बैलाची. कधीही न तुटणारे असे नाते शेतकरी आणि बैलामध्ये निर्माण झाले. दिवसेंदिवस शेतीमधील बैलाचे महत्त्व वाढत गेले. काळ बदलत गेला, शेती आणि वाहतूक यासाठी बैल बारदाना वरदान ठरू लागला. बैलांची मागणी वाढली तशी त्यांची किंमत देखील वाढली. आजही जातिवंत बैलांना लाखो रूपये मोजावे लागतात याची प्रचिती मोहोळ तालुक्यातील एका बैल खरेदी व्यवहारात आढळून आली. 

याविषयी सविस्तर माहिती अशी की, तांबोळे (ता. मोहोळ) येथील प्रगतशील बागायतदार मच्छिंद्र बलभीम पवार यांचा खिलार जातीचा, दाताने चौसा असलेला हरणा बैल सय्यद वरवडे (ता. मोहोळ) येथील प्रयोगशील तथा प्रसिद्ध ऊस उत्पादक शेतकरी नितीन निळे यांनी बैल दोन लाख एक्कावन्न हजार रुपयांना खरेदी केला आहे. एका बैलाची अशी विक्रमी किंमत ऐकून संपूर्ण तालुक्यात या व्यवहाराने  आश्चर्याचा धक्का दिला आहे. पवार यांचे चिरंजीव दिगंबर मच्छिंद्र पवार व दत्तात्रय मच्छिंद्र पवार या दोघा भावांनी तीन वर्षांच्या उमदा व देखण्या अशा या बैलाचा पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव लावून सांभाळ केला आहे. या कामी त्यांना तांबोळे येथील दुग्ध व्यावसायिक सुभाष निवृत्ती कोकाटे व विठ्ठल बलभीम पवार आणि अर्जुनसोंड येथील पशुपालक शेतकरी उल्हास लक्ष्मण डुबल यांचे मार्गदर्शन लाभले होते. 

 या बैलाच्या देखभालीबाबत  बोलताना युवा पशुपालक दिगंबर पवार यांनी सांगितले की, ‘‘दररोज पहाटे चारपासून बैलाची देखभाल करण्यास सुरुवात केली जायची. दररोज सकाळी त्याला आम्ही भाऊ मिळून धुवायचो, त्याच्यासाठी खुराक तयार करायचो. पेंड, भरडा व आटा असा त्याचा खुराक असायचा, यासोबत हिरवा चारा कडवळ, मकवण दिले जायचे. त्याच्या निवाऱ्याची उत्तम सोय आम्ही केली होती. पत्र्याच्या शेडमध्ये खाली काँक्रीट केलेले व त्यावर ऊसाच्या पाचूटाची गादी केली होती. घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे त्याला जीव लावला होता.’’ 
 एकंदरीत जातिवंत अशा या बैलाची पारख झाली होती ती मच्छिंद्र पवार यांना. त्यांनी एक वर्षाचा हा खोंड विकत घेतला होता. योग्य किंमत आल्याने तो बैल विकला असल्याचे समजते. मागील कार्तिकी एकादशीला पंढरपूर येथील बाजारात या बैलास दोन लाख चाळीस हजार रूपयांना मागितले होते. मात्र, खरेदी करणारे नाशिक येथील असल्याने जीवापाड सांभाळलेला हा जीव नजरेसमोरून दूर होऊ द्यायचा नव्हता म्हणून पवार यांनी हा सौदा नाकारला व तालुक्यातच हाकेच्या अंतरावर असलेल्या गावी विकला. जेणेकरून कधीही आठवण आली तर ते जाऊन पाहू शकतील.

आजही गावातल्या छोट्या शेतकऱ्याचा खरा आधार आणि त्याची खरी दौलत बैलजोडीच असते. अशी ही कामधेनुची लेकरे आयुष्यभर शेतकऱ्याच्या पाठीवरील ओझे आपल्या पाठीवर पेलतात. सध्या बैल जोडी सांभाळणे जरी अवघड असले, शेतीत कितीही यांत्रिकीकरण झाले असले तरी आजही गावात दारापुढे बैल जोडी असणं म्हणजे प्रतिष्ठेचे व समृद्धीचे लक्षण मानले जाते. एकेकाळी बैलांशिवाय शेती करणे अशक्यप्राय गोष्ट होती. तशी परिस्थिती आजही काही प्रमाणात आहे. मात्र, आता वाढत्या महागाईत बैलांचे भावही वधारले आहेत. छोट्या शेतकऱ्याला बैल खरेदी करणे आवाक्याबाहेरचे काम वाटू लागले आहे. त्यात जरी बैल खरेदी करायचे ठरवलेच तर बाजारात चांगला बैल ओळखायचा कसा याबाबत नवीन शेतकऱ्याला योग्य माहिती नसते. जुने जाणकार शेतकरीच बैलाची पारख अचूक करत होते. म्हणूनच या जातिवंत खिलार बैलास निळे यांनी इतकी किंमत मोजली आहे. आजही खेडोपाडी शेतकऱ्यांना दारात उभ्या असलेल्या चारचाकी गाडीपेक्षा बैल जोडीचे मोल अधिक वाटते.