होमपेज › Solapur › अबब! बैलाची किंमत अडीच लाख

अबब! बैलाची किंमत अडीच लाख

Published On: Dec 09 2017 1:47AM | Last Updated: Dec 09 2017 1:47AM

बुकमार्क करा

मोहोळ : महेश माने

आधुनिकीकरणामुळे दिवसेंदिवस शेतीमधील बैलांचे महत्त्व कमी होत असताना मोहोळ तालुक्यात एक सुखद घटना घडली आहे. तांबोळे (ता. मोहोळ) येथील प्रगतशील बागायतदार मच्छिंद्र बलभीम पवार यांचा खिलार जातीचा, दाताने चौसा असलेला हरणा बैल सय्यद वरवडे (ता. मोहोळ) येथील प्रयोगशील शेतकरी नितीन निळे यांनी तब्बल 2 लाख 51 हजार रुपयांना खरेदी केला आहे. 

एका बैलाची अशी विक्रमी किंमत ऐकून संपूर्ण तालुक्यात या व्यवहाराने  आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. पवार यांचे चिरंजीव दिगंबर मच्छिंद्र पवार व दत्तात्रय मच्छिंद्र पवार या दोघा भावांनी तीन वर्षांच्या उमदा व देखण्या अशा या बैलाचा पोटाच्या पोरापेक्षा जास्त जीव लावून सांभाळ केला आहे. याकामी त्यांना तांबोळे येथील दुग्ध व्यावसायिक सुभाष निवृत्ती कोकाटे व विठ्ठल बलभीम पवार आणि अर्जुनसोंड येथील पशुपालक शेतकरी उल्हास लक्ष्मण डुबल यांचे मार्गदर्शन लाभले होते. 

या खिलार जातीच्या वळूच्या देखभालीबाबत  बोलताना पशुपालक दिगंबर पवार यांनी सांगितले की, दररोज पहाटे चारपासून बैलाची देखभाल करण्यास सुरुवात केली जाते. दररोज सकाळी धुतले जाते. पेंड, भरडा व आटा असा त्याचा खुराक होता. यासोबत हिरवा चारा कडवळ, मकवण दिले जायचे. त्याच्या निवार्‍याची उत्तम सोय केली होती. घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे त्याला जीव लावला होता, असे पवार यांनी सांगतिले.