Fri, Apr 26, 2019 19:33होमपेज › Solapur › राष्ट्रवादीने भाकरी फिरवली : काँग्रेस कधी फिरवणार?

राष्ट्रवादीने भाकरी फिरवली : काँग्रेस कधी फिरवणार?

Published On: Jul 16 2018 1:20AM | Last Updated: Jul 15 2018 10:19PMमंगळवेढा : प्रा. सचिन इंगळे

आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेत सहभागी होण्यासाठी धडपड करत असलेल्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सध्या पक्षीय कामापासून  कोसो दूर असल्याने हाताचा पंजा सर्वसामान्य माणसांच्या मनात नसल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. 

आ. भारत भालके यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक काँग्रेस  आय पक्षाकडून लढवली आणि मोदी लाटेतही भालके निवडून आले.  पण मतदारसंघातील जनभावनेला आपल्याकडे आकर्षित करण्यात  मंगळवेढा काँग्रेसचे तालुकास्तरीय नेतृत्व कमी पडत असल्याने मंगळवेढ्यातील काँग्रेस हा चिंतेचा विषय बनला आहे. 

गेल्या चार वर्षात ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाची एकही शाखा स्थापन झाली नाही किंवा तालुका कार्यकारिणीसुद्धा जाहीर झाली नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाना, सोसायटी निवडणुकांत काँग्रेसला चमक दाखवता आली नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीबाबत तालुकाभर नाराजीचा सूर असून भाकरी फिरवा, अशी मागणी होत आहे.

एकीकडे  राष्ट्रवादी काँग्रेसने  शहर आणि तालुक्यात खांदेपालट करीत पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करताना वरिष्ठ नेत्यांना जिल्हा कार्यकारिणीत संधी दिली आहे. नव्या दमाच्या लोकांकडे पक्षाची धुरा सोपवली असून हा मतदारसंघ  काँग्रेसकडे असतानाही राष्ट्रवादी आक्रमकपणे काम करीत आहे. ते पाहता काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तालुक्यात सुरुवातीस शिवाजीराव काळुंगे,  इन्नुस शेख, हरी यादव, यादप्पा माळी, अर्जुन पाटील, अविनाश शिंदे, भीवा दोलतोडे, महादेव कोरे यांनी पक्षाचे काम जोमाने केले. मात्र मतदारसंघ पुनर्रचनेत  समीकरणे बदलली आणि काहींनी पक्षाचा फायदा स्वहितासाठी करून घेतला. 

मध्यंतरी मंगळवेढ्यात काही आंदोलने झाली. ती पंढरपूर तालुक्यातील युवक नेत्याला हाती घ्यावी लागली.  मंगळवेढ्यातील समस्या स्थानिक नेत्यांना दिसत नसतील तर या पक्षावर जनतेने कसा विश्‍वास ठेवावा, हा प्रश्‍न आहे. आ. भारत भालके हे  काँग्रेसवासी झाल्यापासून मूळ काँग्रेसमध्ये असलेल्या काही नेत्यांनी पक्षाची झूल अलगदपणे बाजूला ठेवली.  त्यामुळे आ. भालके यांना नव्याने घडी बसवावी लागली असून काही पदे जिल्हास्तरीय वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीने द्यावी लागली आहेत. त्यातील काही मंडळी पक्ष कार्याला वेळ देत नाहीत, ही शोकांतिका आहे. 

पक्षात आ. भालके यांच्यावर प्रेम करणारा गट आहे. त्यांना काँग्रेसमध्ये खांदेपालट करण्याची गरज आहे असे वाटते. अन्यथा आम्ही सतरंज्या  उचलायच्या व मान-सन्मान, व्यासपीठ मठ्ठ पदाधिकार्‍यांना मिळणार, अशी भावना कार्यकर्त्यांत वाढत चालली आहे.