Sun, Aug 25, 2019 23:58होमपेज › Solapur › आरक्षण प्रश्‍नी विशेष अधिवेशन बोलवा : प्रशांत परिचारक यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

'आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशन बोलवा'

Published On: Jul 27 2018 8:03PM | Last Updated: Jul 27 2018 8:03PMपंढरपूर : प्रतिनिधी

मराठा समाजासह धनगर, लिंगायत,महादेव कोळी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत तीव्र भावना लक्षात घेता राज्य शासनाने सर्व पक्षीय नेत्यांना विश्‍वासात घेऊन यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे व आरक्षणाची अधिसूचना काढावी, तामीळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी व घटनेत दुरूस्तीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. 

प्रशांत परिचारक यांच्यावतीने  दि. 26 रोजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र दिले आहे. यामध्ये परिचारक यांनी पुढे म्हटले आहे की, मराठा समाजातील अनेक कुटूंबांना एकवेळ जेवणाची भ्रांत असून त्यांची आरक्षणाची मागणी यापुर्वीच मंजुर व्हायला हवी होती. तसेच मुस्लीम, धनगर, लिंगायत समाजातही एक वर्ग मोठा तर एक वर्ग अत्यंत हलाकीचे जीवन जगत आहे. महादेव कोळी समाजाचा जातीच्या दाखल्याचा प्रश्‍न मार्गी लागल्यास त्यांच्या अनेक समस्या सुटणार आहेत. या विविध प्रश्‍नांवरून राज्यात सध्या आंदोलने सुरू आहेत. याची तातडीने दखल घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाबाबत  शासन स्तरावर निर्णय घेणे, कायदा करणे, मागासवर्गीय आयोगाची नियुक्ती करणे, शिफारस करणे या आवश्यक असणार्‍या सर्व बाबी राज्य सरकारने पुर्ण केल्या आहेत. तरीसुद्धा आरक्षणाबाबतचे ठोस निर्णयास विलंब होत आहे. यामुळे सर्वच मराठा समाज बांधवांच्या तरूण पिढीमध्ये प्रचंड असंतोषाची भावना निर्माण होत आहे. त्याचेच रूपांतर आंदोलमाध्ये झालेले आहे. यासाठी राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. सध्या असलेल्या आरक्षणाचा टक्का वाढवण्यासाठी घटनेत दुरूस्ती करावी लागेल. त्याकरिता देखील सर्व पक्षातील मान्यवरांची मते जाणून केंद्राकडे पाठपुरावा करावा यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची पंतप्रधान यांच्यासमवेत बैठक आयोजित करावी. दरम्यान मागासवर्गीय आयोगाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याबाबत शासनाने विनंती करावी, जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्याचे शासनाने जाहीर करावे. हा प्रश्‍न असाच चिघळत राहिला तर राज्यातील सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती आहे. राज्य सरकारच्या महा नोकर भरतीवरून देखील मोठा असंतोष असून त्यावरही तोडगा काण्यासाठी सर्व समाजातील नेत्यांची बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढावा अशीही मागणी आ. परिचारक यांनी केली आहे.