Mon, Aug 19, 2019 11:24होमपेज › Solapur › पिरळे  जि. प. शाळेत 300 विद्यार्थी 4 शिक्षक

पिरळे  जि. प. शाळेत 300 विद्यार्थी 4 शिक्षक

Published On: Jun 18 2018 10:45PM | Last Updated: Jun 18 2018 8:27PMफोंडशिरस : नानासाहेब गजाकस

 पिरळे ( ता.माळशिरस ) येथील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या  शाळेमध्ये 300 विद्यार्थी असताना फक्‍त 4 शिक्षक आहेत. या शाळेसाठी आणखी 1 मुख्याध्यापक  1पदवीधर शिक्षक  व 3 उपसहशिक्षक अशी एकूण 5 शिक्षकांची गरज आहे. पुरेसे शिक्षक नसल्याने मुलांच्या शालेय प्रगतीवर परिणाम होत आहे.

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या समाधानकारक आहे. परंतु या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या तोकडी आहे. शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जि. प. शाळांतील प्रतिनियुक्तीचे नियोजन करणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवणे गरजेचे असते. ,  अधिक पटसंख्या असलेल्या शाळांवर शिक्षकांची आवश्यकता आहे. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. पिरळे ता.माळशिरस येथील जि.प शाळेत 500 विद्यार्थ्यांचा पट होता परंतु  तालुका शिक्षणाधिकारी यांच्या ढिसाळ  व्यवस्थापन धोरणामुळे कमी शिक्षकांची संख्या असल्याने शालेय शिक्षण दर्जा घसरत चालला आहे.त्यामुळे पालकांनी नाईलाजास्तव आपल्या मुलांना खासगी शाळेत  पाठवले आहे. 500 विद्यार्थ्यांवरून पट घसरण होत 300 वर आला आहे. 

त्यामुळे शिक्षकांनी किती विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचे हा प्रश्न पडला आहे? मुळात माळशिरस तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी  पद गेल्या तीन  वर्षांपासून रिक्‍त असून  तालुक्यातील सत्ताधार्‍यांच्या मर्जीतील विस्तार अधिकारी यांच्याकडे तालुका प्रभारी गट शिक्षण अधिकारी पदाचा कारभार सोपवण्यात आलेला आहे व त्यांच्या व्यवस्थापन  धोरणामुळे खाजगी शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरणाचे उदातीकरण होत असल्याचे दिसत आहेत. 

शालेय शिक्षण विभागाने 28 ऑगस्ट 2015 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात  (जीआरने) एखाद्या शाळेत ठराविक विद्यार्थी संख्येमागे किती शिक्षक असावेत याचे निकष घालून दिलेले आहेत. यापूर्वी शिक्षकांची संख्या एखाद्या इयत्तेत किती तुकड्या आहेत यावर ठरत असे. या जीआरनुसार मात्र ही संख्या तुकड्या हा निकष बाजूला सारून विद्यार्थी संख्येवर ठरणार आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी (किंवा पाचवी)पर्यंत जर शाळेत सर्व मिळून 60 विद्यार्थी असतील तर दोन शिक्षक आणि प्रत्येकी 30 वाढीव विद्यार्थ्यांमागे एक जादा शिक्षक आता मिळणार आहे. एखाद्या प्राथमिक शाळेत वर्गात 3/4/5च्या एकाच वर्गात जर 20 पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर प्रत्येक वर्गासाठी वेगळे शिक्षक मिळतील. 

उच्च माध्यमिक (पाचवी/ सहावी/ सातवी)पर्यंतच्या शाळांमध्ये तीनही वर्गामध्ये 36 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास 3 शिक्षक (विज्ञान/ गणित भाषा व समाजशास्त्र यांना प्रत्येकी एक) मिळतील. विद्यार्थ्यांची संख्या 105 पेक्षा अधिक झाल्यास 35 च्या पटीमध्ये 1 अतिरिक्त शिक्षक मिळेल. माध्यमिक (नववी/ दहावी)च्या वर्गामध्ये 40 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास भाषेचा 1, विज्ञान-गणित विषयांचा 1 व समाजशास्त्राचा 1 असे तीन शिक्षक मान्य करण्यात येतील. नववी व दहावीच्या कोणत्याही वर्गात 60 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास शिक्षकांचे एक पद जादा मिळेल. 

विद्यार्थी संख्येच्या चाळीसच्या पटीत एक जादा शिक्षक मिळतो. परंतु सर्व निकष गुंडाळून ठेवले जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे यांचा जिल्हा परिषद शाळा हा जिव्हाळ्याचा विषय नेहमीच राहिला आहे त्यांनी व  जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी माळशिरस तालुक्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.