Tue, Jul 07, 2020 21:32होमपेज › Solapur › अ‍ॅड. आंबेडकरांची सोलापूर लोकसभेसाठी चाचपणी

अ‍ॅड. आंबेडकरांची सोलापूर लोकसभेसाठी चाचपणी

Published On: Jul 08 2018 1:46AM | Last Updated: Jul 08 2018 12:02AMसोलापूर : बाळासाहेब मागाडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत चाचपणी सुरु केली आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या सोलापूर दौर्‍यात त्यांनी विविध समाजघटकांतील कार्यकर्ते, नेत्यांशी चर्चा केली असून येथूनच लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी त्यांना केला 
आहे.

महाराष्ट्रातील वंचित, शोषित, भटक्या-विमुक्तांना सत्तेत हक्काने संधी मिळावी, यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली ‘वंचित बहुजन आघाडी’ स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीच्यावतीने राज्यभरात मेळावे घेऊन संघटन केले जात आहे. अ‍ॅड. आंबेडकर यांनी दोन महिन्यांपूर्वीच पंढरपूर येथे विराट सभा घेतली होती. तीन दिवसांपूर्वी सोलापूर येथे झालेल्या त्यांच्या दौर्‍यात कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून आला.

सोलापूर जिल्हा नेहमीच आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला राहिला आहे. मुंबई, नाशिक, नागपूर या जिल्ह्यांबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सोलापूरशी सतत संपर्क होता. महाराष्ट्र आणि भारतात जेथे जेथे बाबासाहेबांच्या सभा झाल्या, परिषदा झाल्या तेथे तेथे मन्वंतर घडले. त्यादृष्टीने सोलापूर मागे नव्हते. उलट इतर जिल्ह्यांपेक्षा सोलापूर जिल्ह्यात जास्त क्रांतीकारक घटना घडल्या आहेत. डॉ. आंबेडकरांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात सोलापूर येथूनच केली. आंबेडकरोत्तर कालखंडात नामांतर चळवळ, रिडल्स आंदोलन त्यासोबतच अन्याय-अत्याचारांविरोधातील विविध आंदोलनांत सोलापूर अग्रभागी राहिले. 

सोलापूर अनुकूल
सोलापूर शहर व जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीचे मोठे संघटन आहे. ते काही प्रमाणात विखुरले असले तरी कार्यकर्ते जिद्दीचे व निष्ठावान असल्याने अ‍ॅड. आंबेडकर यांनी यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. पंढरपूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर खा. रामदास आठवले यांनी तेथून नेतृत्त्व केले होते. मात्र हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गास सुटल्याने आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून हार पत्करावी लागली, हे सर्वज्ञात आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना केवळ आंबेडकरीच नव्हे तर इतर जाती-धर्मातील समाजघटकही मानणारा आहे. त्यामुळे त्यांना सोलापूर मतदारसंघ अनुकूल ठरेल, असे जाणकारांचे मत आहे.

कार्यकर्त्यांचे बैठकांचे सत्र
तीन दिवसांपूर्वी सोलापूर येथे झालेल्या ‘वंचित बहुजन आघाडी’च्या सभेत अनेक नेते, कार्यकर्त्यांनी उघडपणे सोलापुरातून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला होता. याचअनुषंगाने अ‍ॅड. आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ‘वंचित बहुजन आघाडी’चे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. रविवार, 8  रोजी याचअनुषंगाने ‘वंचित बहुजन आघाडी’ची महत्त्वाची बैठक सोलापुरात होत आहे. या बैठकीत निवडणूक रणनीतीबाबत व्यूहरचना आखली जाणार आहे.

सोलापूर मतदारसंघातून अनेकजण इच्छुक
तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना हार पत्करावी लागली होती. मागील निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करुन अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी येथे विजय संपादन केला. भाजपचे पुणे येथील खा. अमर साबळे हेसुद्धा सोलापूरची चाचपणी करीत आहेत. मध्यंतरी खा. आठवले यांनीही सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे सुतोवाच केले होते.  अशातच भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना महाराष्ट्रात सहानुभूती वाढल्याने त्यांनी ताकदीने संघटन सुरु केले आहे. तेही या मतदारसंघातून निवडणूक लढविता येईल का, याबाबत चाचपणी करीत आहेत.