Sun, May 26, 2019 12:37होमपेज › Solapur › प्रहारच्या कार्यकर्त्यांवर शासकीय कामात व्यत्यय आणल्याचा गुन्हा

प्रहारच्या कार्यकर्त्यांवर शासकीय कामात व्यत्यय आणल्याचा गुन्हा

Published On: Jan 11 2018 1:09AM | Last Updated: Jan 10 2018 10:16PM

बुकमार्क करा
टेंभुर्णी : प्रतिनिधी 

शेतीपंपांचा खंडित करण्यात आलेला विद्युतपुरवठा चालू करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्यावतीने टेंभुर्णी व दहिवली येथील वीज वितरण कंपनीच्या  कार्यालयावर मोर्चा काढून शासकीय कामात व्यत्यय आणल्याचा कारणावरून प्रहार शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे व त्यांच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रहार शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे व त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी परवानगी नसताना मोर्चा काढून टेंभुर्णी येथील वीज वितरणच्या कार्यालायत 8 जानेवारी  रोजी दुपारी 12.30 वा. दरम्यान व दहिवली येथील वीज वितरणच्या  कार्यालयात त्याच दिवशी दुपारी 3.30 वा.दरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा टेंभुर्णी पोलिसांत  दाखल करण्यात आला आहे.
याबाबत टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी 12.30 वा. सुमारास प्रहार शेतकरी  संघटनेच्यावतीने अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली खंडित विद्युतपुरवठा चालू करण्याच्या मागणीसाठी टेंभुर्णी येथील विद्युत मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात  आला होता. कार्यालयात मोर्चेकर्‍यानी  ठिय्या मांडून विद्युतपुरवठा का बंद केला असल्याचा जाब विचारला व घोषणा दिल्या. यावेळी कार्यकर्ते काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर आंदोलनकर्ते घोषणा देत निघून गेले.

त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजण्याच्यादरम्यान दहिवली उपकेंद्र येथील कार्यालयावरही  बेकायदेशीर 20 ते 25 जणांना घेऊन अतुल खुपसे मोर्चा काढून उपकेंद्रात घुसले. तेथे गणेश महादेव बागवाले हे यंत्रचालक उपस्थित होते. त्यांना वीजपुरवठा बंद का केला असल्याचा जाब विचारला. यावर गणेश बागवाले यांनी बिले भरली नसल्याने वरिष्ठांच्या आदेशावरून वीजपुरवठा बंद केल्याचे सांगितले. मात्र ते खंडित वीजपुरवठा आम्ही सुरु करणार म्हणून गोंधळ घालू लागले. बागवाले यास रिडिंग घेण्याचे कामही करू दिले नाही तसेच अतुल खुपसे यांनी विद्युतलाईनचे जंप जोडण्यास सांगितले. परंतु त्यांना ते जोडता आले नाहीत. यानंतर ते निघून गेले. 

यानंतर बागवाले यांनी बार्शीचे कार्यकारी अभियंता ताडे यांना  माहिती दिली. याबाबत टेंभुर्णी उपकेंद्राचे उपअभियंता टी.जे.भांगे यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अतुल खुपसे, सतीश शिरसकर, प्रकाश सुरवसे, अतुल ताकतोडे, दत्तात्रय व्यवहारे, रमेश व्यवहारे यांच्यासह चाळीसजणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले. दहिवली उपकेंद्राच्या घटनेबाबत गणेश महादेव बागवाले, रा. टेंभुर्णी यांनी अतुल खुपसे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास पोनि आनंद खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कांतीलाल माने हे करीत आहेत.