Thu, Aug 22, 2019 08:12होमपेज › Solapur › प्रहार संघटनेच्या महिलाध्यक्षांकडून तलाठ्यास मारहाण(व्हिडिओ)

प्रहार संघटनेच्या महिलाध्यक्षांकडून तलाठ्यास मारहाण(व्हिडिओ) 

Published On: Mar 16 2018 6:06PM | Last Updated: Mar 16 2018 6:23PMसोलापूर : वार्ताहर 

माढा तालुक्यात (जि. सोलापूर)शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाणीचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास तालुक्यातील उपळवटे येथे गावकामगार तलाठी जी.वाय ढोकणे यांना प्रहार संघटनेच्या महिलाध्यक्षा अलका गायकवाड यांनी खरेदी नोंद धरण्याच्या कारणावरून मारहाण केली. सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची तालुक्यात  आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. 

याबाबत टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तलाठी जी.वाय ढोकणे हे कार्यालयात कामकाज पाहत असताना उपळवाटे येथील प्रहार संघटनेची महिला अध्यक्षा अलका गायकवाड यांच्यासह इतर दोन जणांनी जमिनीची नोंद धरण्याच्या कारणाने तलाठ्याशी हुज्जत घालत त्‍यांना बेदम मारहाण केली. तसेच या मारहाणीचा व्हिडिओ बनवला आहे. याबाबत तलाठी ढोकणे यांनी सांगितले की, ‘‘मी नियमाप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार सर्व नोंदी केलेल्या असताना शासकीय कामात अडथळा आणत मला नाहक मारहाण केली आहे.

दरम्यान, या मारहाण प्रकरणाची तलाठी संघटनेने गंभीर दखल घेतली असून, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पांडेकर, तालुकाध्यक्ष किसन दळवे, उपाध्यक्ष आर.एस.चव्हाण, यांच्यासह संबंधित संघटनेचे पदाधिकारी, सर्व तलाठी यांनी या घटनेचा निषेध करत मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेची फिर्याद नोंदविण्याचे काम टेंभूर्णी पोलिस ठाण्यात  सुरु होते.