करमाळाः प्रतिनिधी
शेतीपंपांचा विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने पिके जळून निघाली आहेत. याप्रकरणी वीज वितरण कार्यालयच जाळून टाकण्याचा इशारा प्रहार संघटनेतर्फे देण्यात आला होता. त्यामुळे आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अतुल खुपसे-पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
करमाळा शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. पिके शेतावर जळून जात आहेत. याविरूध्द प्रहार संघटनेचे नेते अतुल खुपसे-पाटील यांनी पिके जळण्यास कारणीभूत ठरत असलेले वीज वितरण कार्यालय जाळणार, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला होता.
त्यानुसार बुधवारी ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने फिरत होते. सकाळपासून पोलिस त्यांच्या मार्गावर होते. सायंकाळी ६ वाजता करमाळा येथील वीज वितरण कार्रालयासमोरून त्यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करून करमाळा पोलिस ठाण्यामध्ये आणण्यात आले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सोशल मीडियावर चर्चा
सकाळपासून प्रहार कार्यकर्त्यांनी करमाळा तालुक्यात फेसबुक, व्हॉट्सअॅपवर महावितरण कार्यालय जाळण्यासंबधीच्या पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामुळे प्रहार कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली. सोलापुरवरून राखीव दलाची जास्तीची फौज मागवण्यात आली होती. तालुक्यातील सर्व महावितरण कार्यालयांना पोलिसांनी सुरक्षा दिली.