Wed, Aug 21, 2019 02:21होमपेज › Solapur › ‘प्रहार’ने वीजपुरवठा केंद्र घेतले ताब्यात

‘प्रहार’ने वीजपुरवठा केंद्र घेतले ताब्यात

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:57PM

बुकमार्क करा

टेंभुर्णी : प्रतिनिधी

टेंभुर्णी व परिसरातील शेतकर्‍यांचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून बंद केल्याने संतप्त झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकर्‍यांनी  टेंभुर्णीतील वीज वितरण कार्यालय ताब्यात घेऊन जोरदार ठिय्या आंदोलन केले. सुमारे चार तासानंतर अधिकार्‍यांनी बंद असलेला वीजपुरवठा सुरू केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

वीजबिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने 3 दिवसांपासून पाणी उपसा पंपाचा वीजपुरवठा बंद केला होता. यामुळे प्रहार संघटनेचे राज्याचे संपर्कप्रमुख अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी 12 वाजता शेतकर्‍यांनी अचानक टेंभुर्णी वीज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरु केले. वीजपुरवठा पूर्ववत सुरु झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा दिला. अचानक केलेल्या आंदोलनामुळे वीज वितरण कर्मचार्‍यांचा एकच गोंधळ उडाला. 

खुपसे यांनी सांगितले की, 7.5 एच.पी.च्या वरील वीजपंपास वीज मीटर असले पाहिजे. त्याप्रमाणे वीजबिल आकारणी होत नाही. वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी संबंधितांना माहिती दिली पाहिजे. नियमानुसार 15 दिवस अगोदर नोटीस देण्यात आलेली नव्हती. वीजबिल घरपोच मिळाले पाहिजे. काही शेतकर्‍यांना कनेक्शन नसताना लाखोंचे बिल आले आहे. याविषयी उपस्थित अधिकार्‍यांना जाब विचारला व पूर्वकल्पना न देता वीज कनेक्शन तोडणे म्हणजे शेतकर्‍यांची भाकरी हिसकावल्याप्रमाणे आहे, असे सांगितले. अद्याप शेतकर्‍यांना उसाचे बिल मिळाले नाही तर मग पैसे कसे भरायचे, असा प्रश्‍न उपस्थित केला.


कर्मचार्‍यांच्या घरचा वीजपुरवठा बंद करण्याचा इशारा

कार्यालय ताब्यात घेतल्यापासून एका  तासात वीज सुरु केली नाहीतर वीज वितरण कर्मचार्‍यांच्या घराचा वीजपुरवठा बंद करण्याचा इशारा यावेळी दिला होता. वीज सुरु होत नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही, असा इशारा दिल्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.  शासनाचा वीज बंद करण्याविषयी आलेल्या आदेशाची प्रत दाखवा, अशी मागणी लावून धरली असता व अडीच तास होऊनही आंदोलक हटत नसल्याने अखेर सहाय्यक अभियंता एस.जी. कुंभार यांनी वरिष्ठांशी चर्चा करून वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करीत असल्याचे सांगितले. यामुळे आंदोलन थांबविण्यात आले.

शेतकर्‍यांनी फटाके फोडले
या आंदोलनामुळे टेंभुर्णीसह उपविभागातील 49 गावांतील विजेचा प्रश्‍न मार्गी लागल्याने शेतकर्‍यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी रमेश पाटील, सतीश सिरसकर, अमोल पाटील, प्रकाश खुपसे, दत्ता व्यवहारे, अशोक देवकर, शिवानंद गायकवाड, अशोक देवकर, अविनाश देशमुख, हनुमंत जगताप, उमेश खोचरे, ज्ञानू कातुरे, हनुमंत अनपट, विकी मोरे, संजय राऊत, सोमा कातुरे, ठिलु पाटील, गणेश यादव, अमोल घाडगे  आदी उपस्थित होते.