Thu, Nov 22, 2018 17:08



होमपेज › Solapur › ‘प्रहार’चे चिमणीवर चढून आंदोलन

‘प्रहार’चे चिमणीवर चढून आंदोलन

Published On: Aug 05 2018 1:34AM | Last Updated: Aug 04 2018 10:30PM



सोलापूर : प्रतिनिधी

कारखान्याकडून उसाचे बिल वेळेवर मिळत नसल्याने मुस्ती गावच्या शेतकर्‍यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवर चढून घोषणाबाजी केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत चालू होते. 

सूर्यकांत महादेव पाटील  (वय 42) असे मृत शेतकर्‍याचे नाव होते. 30 जुलै रोजी रात्री तणावातून विषारी औषध पिऊन त्यांनी आत्महत्या केली होती. सिद्धेश्‍वर साखर कारखान्याने मागील उसाचे दोन लाख 59 हजार रुपयांचे बिल दिले. मात्र, पुन्हा घातलेल्या उसाचे बिल तीन महिने हेलपाटे मारूनही मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे पाटील यांनी चिठ्ठीत नमूद केले होते. या निषेधार्थ प्रहारचे अजित कुलकर्णी, जमील शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी सिद्धेश्‍वर सहकारी कारखान्याच्या चिमणीवर चढून घोषणाबाजी केली. कारखाना प्रशासनाविषयी निषेध व्यक्त केला. मृत सूर्यकांत पाटील या शेतकर्‍यांच्या कुटुंबाला कारखान्याने  आर्थिक मदत करावी या मागणीसह शेतकर्‍यांची थकीत बिले लवकरात लवकर शेतकर्‍यांना द्यावीत, या मागणीकरिता चिमणीवर चढून आंदोलन केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी सहाजणांना ताब्यात घेतल्याचे सांगितले.