Sun, May 26, 2019 15:23होमपेज › Solapur › एसटीची पूजा करुन प्रहार संघटनेचे आंदोलन

एसटीची पूजा करुन प्रहार संघटनेचे आंदोलन

Published On: Jul 30 2018 1:33AM | Last Updated: Jul 29 2018 11:15PMसोलापूर : प्रतिनिधी

तोंड अर्धे काळे करुन व एसटी बसची पूजा करुन मराठा आरक्षणाची मागणी प्रहार संघटनेने जुना पुणे नाका येथील संभाजी चौकात केली.राज्यभरात आरक्षणाच्या वणव्यात एसटी बसेस पेटवल्या जात आहेत किंवा फोडल्या जात आहेत. परंतु प्रहार संघटनेच्यावतीने एस.टी. बसची पूजा करुन अनोखे आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ठोक मोर्चा आंदोलन सुरु झालेले आहे. यंदाच्या मराठा मोर्चांनी राज्यात उग्ररुप धारण केले आहे. पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर  सोलापूर  शहरातील  मराठा समाजाने वारकर्‍यांना आंदोलनाचा त्रास होऊ नये म्हणून आंदोलन उशीराने सुरु केले. कोपर्डी हत्याकांडानंतर गेल्या वर्षीपासून  राज्यभरात एकूण 58 मूक मोर्चे झाले.सर्व मोर्चांमध्ये मराठा आरक्षणाची प्रमुख मागणी करण्यात आली होती.त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे आवाहनदेखील दिले होते. परंतु आजतागायत कोणत्याही प्रकारचे आरक्षण दिले गेले नाही. उलट राज्यभरात मेगा भरतीमध्ये मराठा समाजाला ओपनमधून ग्राह्य धरले जात आहे. सकल  मराठा   समाज यांच्यावतीने गेल्या दोन दिवसांत आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने नुकतेच सहकार मंत्री व पालकमंत्री यांच्या घरासमोर आसूड मार आंदोलन करण्यात आले. 30 जुलै रोजी सोलापूर कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व पक्षांकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला जात आहे.प्रहार संघटनेच्या पदधिकार्‍यांनीदेखील या  मराठा आरक्षणाला पाठिंबा देत रविवारी सायंकाळी जुना पुणे नाका येथील संभाजी चौकात तोंडाला काळे फासून व एस.टी. बसची पूजा करुन आपला पाठिंबा जाहीर केला व फक्त  आश्‍वासन देणारे शासन अशा घोषणा देत राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.

यावेळी प्रहार  शेतकरी संघटना व जनशक्ती पक्षाचे जमीर शेख, अजित कुलकर्णी, खालिद मनियार, राजा चव्हाण, दत्ता म्हस्के-पाटील, मुश्ताक शेतसंदी, इब्राहिम जमादार, संभाजी व्हनमारे, मुदस्सर हुंडेकरी, अयाज शेख, शब्बीर नदाफ आदी उपस्थित होते. 

मंत्र्यांना काळे फासणार
मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या फोटोला काळे  फासून प्रहार संघटनेने सरकारचा निषेध केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एसटीची पूजा करून गांधीगिरी करत अर्धे तोंड काळे करून सरकारचा निषेध केला. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर उद्या मंत्र्यांना काळे फासू, असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे.