Thu, Apr 25, 2019 15:41होमपेज › Solapur › ‘घरकुल’मध्ये सोलापूर जि. प. देशात प्रथम

‘घरकुल’मध्ये सोलापूर जि. प. देशात प्रथम

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 10:54PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

 पंतप्रधान आवास योजना ग्रामीण  योजनेतील ऑनलाईन रजिस्ट्रेेशन करण्यात सोलापूर जिल्हा परिषदेने देशात पहिला क्रमांक पटकाविला आहे. 13 हजार 29 घरकुले ग्रामीण भागासाठी मंजूर करुन यासाठी पहिला व दुसर्‍या टप्प्याने एकूण 75 कोटी रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना बांधकामासाठी देण्यात आले आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या नेतृत्वाखाली जि.प. टीमने देशात या योजनेत बाजी मारल्याने जिल्हा परिषदेचे कौतुक होत आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येते. 13 हजार 29 घरकुलांपैकी 9 हजार 400 घरकुलांना बांधकामासाठी पहिला हप्‍ता प्रत्येकी 30 हजार रुपयांप्रमाणे 28 कोटी 20 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. 7 हजार 798 घरकुलांना दुसरा हप्‍ता प्रत्येकी 60 हजारांप्रमाणे 46 कोटी 78 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. 7 हजार 250 घरकुलांचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असल्याने त्यांना उर्वरित सर्व देय रक्‍कम देण्यात येत आहे.  सन 2017-18 या वर्षाकरीता प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 5 हजार 278 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शबरी योजनेतून 45, तर पारधी विकास आवास योजनेतून 72 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रमाई आवास योजनेसाठी तब्बल 5 हजार 870 घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या योजनेचे नियोजन करुन घरकुलांचे काम प्रगतीपथाकडे नेण्याचा प्रयत्न ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे करीत आहेत.  घरकुल योजना पारदर्शक वातावरणात राबवून लाभार्थ्यांची निवड योग्य व्हावी व वेळेत अनुदान वितरित व्हावे यासाठी या योजनेचे काम ऑनलाईन प्रणालीने करण्यात येत आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकूण 50 हजार 31 कुटुंबांचे प्रस्ताव दाखल असून यापैकी 49 हजार 293 कुटुंबांचे प्रस्ताव अर्ज ऑनलाईन प्रणालीने नोंदणी करण्यात आले आहेत. 738 कुटुंबांची नोंदणी करणे बाकी आहे. 

सोलापूर जिल्ह्याभरात नोंदणी करण्याचे काम 99 टक्के असून या उपक्रमात सोलापूर जिल्हा परिषद देशात पहिल्या क्रमांकावर राहिली गेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारुड यांनी या उपक्रमासाठी सातत्याने पंचायत समिती स्तरावरील यंत्रणा बैठका घेऊन योजना गतिमान केली होती. बार्शी, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट, करमाळा, मोहोळ या तालुक्यांचे काम या उपक्रमात 100 टक्के असून मोहोळ तालुक्याचे 98, सांगोला तालुक्याचे 97, तर माढा तालुक्याचे 94 टक्के काम झाले आहे.