होमपेज › Solapur › सकारात्मक बदलाने विकासकामांना गती

सकारात्मक बदलाने विकासकामांना गती

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 9:06PM

बुकमार्क करा
सोलापूर ः संतोष आचलारे

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड या दोघांनी सरत्या वर्षातील कामांचा आढावा घेत नव्या वर्षात दमदार व चांगल्या कामाचे नियोजन करण्याचा संकल्प व नियोजन केल्याने जि.प. विकासकामांना गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 

जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख यांना जिल्हा परिषदेत बोलावून आढावा बैठक घेतली. मार्चअखेरपर्यंत खर्च होणे आवश्यक असणारा सर्व निधी मार्च महिन्यात कशा पद्धतीने खर्च करण्यात येणार आहे याची माहिती त्यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली. शिवाय निधी खर्च होणार असल्याने जिल्हा नियोजन समितीमधून आणखीन वाढीव निधीसाठी त्यांनी पालकमंत्र्यांना यावेळी गळ घातली. त्यामुळे नियोजन समितीकडून आणखीन निधी जिल्हा परिषदेला मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 

सेसफंडातील व जिल्हा नियोजन समितीमधील निधी कशा पद्धतीने खर्च होणार आहे, कोणता निधी खर्च होणार नाही याचा ठाम अंदाज शिंदे यांना आल्याने त्यांनी अखर्चित राहणार्‍या 1 कोटी 80 लाखांच्या निधीचे पुुनर्नियोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही कौशल्यक्षमताही कौतुकास्पद ठरली गेली आहे. इतकेच नव्हे दर ज्या निधीला खर्च करण्यासाठी दोन वर्षांचा अवधी आहे तो निधी पहिल्या वर्षातच कशा पध्दतीने खर्च करता येईल याबाबत नियोजन करण्यात आले असल्याने निधी खर्चाला नव्या वर्षात गती मिळण्याची शक्यता आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी सरत्या वर्षात अपेक्षेप्रमाणे शिक्षण व आरोग्य दोन्ही विभागांकडे लक्ष दिल्याने या दोन्ही विभागांत चांगले काम झाले. शिक्षणाची गुणवत्ता जोपासतानाच अनेक नवीन प्रयोग राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करता आला. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचीही परीक्षा घेऊन या शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्याचे काम डॉ. भारुड यांनी केले. 

आरोग्य विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक कन या डॉक्टरांना ग्रामीण दवाखान्यात खासगी दवाखान्याप्रमाणेच सर्वसामान्यांवर उपचार करण्याचा मंत्र डॉक्टरांना दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्याच्या सुविधा निर्माण होण्यास मदत झाली आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत सोलापूर जिल्हा लाभ घेणारा सर्वात अग्रेसर जिल्हा ठरला गेला आहे. 

शिक्षण व आरोग्यात आलेल्या यशानंतर या दोन्ही विभागांची गुणवत्ता कायम ठेवून कृषी व पशुसंवर्धन विभागाकडे डॉ. भारुड यांनी विशेष लक्ष देण्याचा सकंल्प केला आहे. त्यामुळे उपेक्षित असलेल्या विभागांना ‘अच्छे दिन’ येण्याची आशा निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांना शेतीशिवाय अन्य पूरक व्यवसाय व उद्योग उभारणीसाठी प्रेरणा देऊन त्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न डॉ. भारुड यांच्याकडून करण्यात येत असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक सधनता येण्याची आशा निर्माण झाली आहे. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने शेतकर्‍यांसाठी दूध उत्पादन व दूधजन्य प्रक्रिया पदार्थ विक्रीसाठी, देशी गायी जोपासण्यासाठी जाणीवपूर्वक प्रेरणा देण्याचे काम नव्या वर्षात होत असल्याने पशुपालक, अल्पभूधारक व भूमिहिन शेतकर्‍यांच्या आशा पल्‍लवित झाल्या आहेत.