Mon, Jun 17, 2019 04:40होमपेज › Solapur › ९०० कोटींचे सहाय्य

९०० कोटींचे सहाय्य

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 8:55PMसोलापूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री महोदय यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून महाराष्ट्रातील गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकीय मदत म्हणून मिळून देण्याकरिता 13 मार्च 2015 रोजी स्थापन झालेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गत तीन वर्षांत जवळपास 900 कोटी रुपयांची आर्थिक मदत व सवलत राज्यातील गोरगरीब जनतेला उपलब्ध करून दिली गेल्याची माहिती कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी दै. ‘पुढारी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आर्थिक दुर्बल असलेल्या कुटुंबीयांना सदस्य आजारी असल्यास त्याला तातडीने आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, या हेतुने या कक्षाची स्थापना केली होती. या कक्षाच्या माध्यमातून गत तीन वर्षांत 30 हजारहून अधिक रुग्णांना आर्थिक लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. या कक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी शेटे यांनी कक्षाचे कामकाज आणि त्यामाध्यमातून उपलब्ध करून दिल्या गेलेल्या सुविधांची माहिती दिली. 

शेटे म्हणाले की, मुख्यमंत्री महादेय यांनी या कक्षाची स्थापना केल्यानंतर सर्वप्रथम आपली धर्मादाय रुग्णालयाच्या उच्चाधिकार तपासणी समितीमध्ये नियुक्‍ती केली. त्यानंतर आपण धर्मादाय अंतर्गत 450 पेक्षा अधिक धर्मादाय रुग्णालयावर 10% + 10% राखीव खाटा या गरीब लोकांसाठी करोडो रुपयांचा ख.झ.ऋ. फंड हा मोफत उपचार व सवलतीकरिता संबंधित हॉस्पिटल यांना वापरण्यास भाग पाडले. 

मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून कॅबिनेट हॉलच्या बाजूला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन केलेला आहे. या कक्षाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब रुग्णांना मदत केली जाते व राज्यातील धर्मादाय आयुक्‍तालय यांच्यामार्फत निर्धन (50 हजार पेक्षा कमी) व दुर्बल (1 लाख रुपये उत्पन्न असलेले) या दोन गटात विभागल्यानुसार त्यांना मोफत व सवलतीच्या दरामध्ये उपचार करण्याचे प्रथमतः तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत आर्थिक मदत केली जाते. 

या योजनेचा मुख्य उद्देश हा आर्थिक दुर्बल घटकातील गोरगरीब (निर्धन व दुर्बल घटक) रुग्णांना वैद्यकीय मदत देऊन त्यांना असणार्‍या आजारातून मुक्‍त करून त्यांना जीवनमान जगण्यास मदत करणे हा असल्याचे सांगून शेटे म्हणाले की,  हा कक्ष महाराष्ट्र राज्यातील तमाम नागरिकांना तसेच गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सुरु करण्यात आलेला आहे.

5 लाख लाभार्थी धर्मादाय अंतर्गत (निर्धन व दुर्बल घटक) यांना मोफत व सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार राज्यशासनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये देण्यात आले. तत्कालीन राज्यशासनामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामार्फत महत्तम मदत ही 25 हजार इतकी होती. परंतु 13-08-15 पासून महत्तम मदत ही 2 लक्ष परंतु त्यामध्ये सुधारणा करून जानेवारी 2016 पासून महत्तम मदत म्हणजे 3 लक्ष वैद्यकीय मदत म्हणून देण्याचा असा महत्त्वपूर्ण निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांनी घेतल्याचे शेटे म्हणाले. 

महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांकडून रुग्णांना आय.पी.एफ. अंतर्गत मोफत उपचार मिळावेत याकरिता धर्मादाय आयुक्‍तालय यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाला संकेतस्थळ चालू करून देण्यात आलेला आहे. राज्यातील काही धर्मादायअंतर्गत समाविष्ट असलेल्या रुग्णालयाने रुग्णांना चॅरिटी कोट्यामधून उपचार करण्यास नकार देऊन संबंधित रुग्णांकडून उपचार करण्यास लागणारा सर्व खर्च घेत असत. अशा रुग्णालयांवर तत्काळ कार्यवाही करुन संबंधीत लाभार्थ्यांना लाखो रुपये परत मिळवून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत 24 ऑगस्ट 2015 रोजी महाराष्ट्रातील सर्व धर्मादाय रुग्णालयावर व राजीव गांधी अंतर्गत रुग्णालय शासकीय, निमशासकीय वैद्यकीय अधीक्षकांना निमंत्रित करण्यात आलेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय यांनी सुरू केलेल्या कक्षाला महाराष्ट्रातून भरपूर प्रतिसाद मिळू लागला असून, राज्यात ठिकठिकाणी या कक्षाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे आयोजित करुन गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचे शेटे यांनी सांगून महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांना भेटी देऊन त्या परिसरातील रुग्णांना वैद्यकीय उपचार हे मोफत व सवलतीच्या दरात करण्याबाबत आपण सूचना केल्या असल्याचे शेटे यांनी शेवटी सांगितले.