Thu, Jun 20, 2019 06:42होमपेज › Solapur › अकलूजच्या डाळिंब मार्केटमध्ये दरात तेजी

अकलूजच्या डाळिंब मार्केटमध्ये दरात तेजी

Published On: Feb 02 2018 11:46PM | Last Updated: Feb 02 2018 11:28PMअकलूज : तालुका प्रतिनिधी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरु केलेल्या डाळिंब मार्केटमध्ये तेजी आली असून भगव्या डाळिंबाला 30 रुपयांपासून ते 101 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे.   गेल्या तीन आठवड्यांत सुमारे 3 कोटी रुपयांची उलाढाल आहे. डाळिंबाचे दर वाढू लागल्याने शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. 

अकलूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डाळिंब मार्केटला सुरुवात केली आहे. गेल्या तीन आठवड्यांत या मार्केटला शेतकरी, व्यापारी व अडते यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या मार्केटमध्ये बाजार समितीने वीज, पाणीपुरवठा करुन  स्वच्छता ठेवल्याने अल्पावधीतच या डाळिंब मार्केटला  ‘अच्छे दिन’  आले आहेत. डाळिंब मार्केट सुरु करण्यात आल्याने या परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी व व्यापारी यांना फायदा झाला आहे.

या मार्केटमधून व्यापार्‍यांनी खरेदी केलेला माल हा आकर्षक पॅकिंग करुन मुंबई, दिल्ली, बिहार, कानपूर, लखनौ, सिलीगुडी,  कोलकाता आदी ठिकाणी पाठविला जात आहे. यामुळे डाळिंबाला चांगला दर मिळत असल्याचे व्यापार्‍यांनी  सांगितले.  अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे म्हणाले की, बाजार समितीकडे 150 अडत्यांनी व व्यापार्‍यांनी डाळिंब मार्केटसाठी मागणी केली होती. परंतु सध्या 27 व्यापार्‍यांना परवानगी दिली आहे. मंगळवार, गुरुवार व रविवार असे तीन दिवस डाळिंब मार्केट भरविले जाते. गुरुवारी डाळिंबाची 3900 क्रेटची आवक झाली. शेतकर्‍यांच्या मालाचे आकर्षक पॅकिंग करुन हा माल बाहेरच्या राज्यात पाठविला जात आहे. सध्या डाळिंबाला चांगला भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.मागील काही दिवसांपासून डाळिंबच्या दरात सातत्याने घट व्हायला लागली होती. त्यामुळे डाळिंब उत्पादकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.