होमपेज › Solapur › सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादन संकटात

सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादन संकटात

Published On: Dec 16 2017 1:50AM | Last Updated: Dec 15 2017 9:47PM

बुकमार्क करा

सांगोला : वार्ताहर 

तालुक्यातील डाळिंबाचे दर चालू वर्षी विक्रमी घसरल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नैसर्गिकरित्याच आवर्षण प्रवण भौगोलिक क्षेत्र असलेल्या सांगोला तालुक्यात डाळिंब या फळपिकास पोषक वातावरण आहे. उपलब्ध मर्यादित पाण्यावरच आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करून सांगोला तालुक्यातील शेतकर्‍यांनी डाळिंब पिकाचे विक्रमी उत्पन्न आजवर मिळविले. 

अजनाळे (ता. सांगोला) या गावाचा महाराष्ट्रातील सर्वांत  श्रीमंत गाव म्हणून यामुळेच उल्‍लेख होतो. परंतु चालू वर्षी नेहमीच शेतकर्‍यांना आधार देणार्‍या डाळिंबाचे दर विक्रमी घसरून गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावरच आल्याने डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. 
डाळिंब यंदा सांगोल्याच्या बाजारात सरासरी 20 ते 25 रुपये दराने विकले जात आहे. हेच डाळिंब गतवर्षी सरासरी 60 ते 65 रुपये किलो दराने विकले जात होते. निर्यातक्षम डाळिबाचे दर यंदा अवघ्या 60 ते 65 रुपयांवर आले आहे. सांगोल्यातील डाळिंब मार्केटमध्ये डाळिंबाची आवक प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. यामुळेच डाळिंबाचे दर घसरले असल्याचे व्यापारी वर्गामधून बोलले जात आहे. 

डाळिंबातून मिळणार्‍या उत्पन्नावर मोठ मोठे स्वप्ने पाहणार्‍या शेतकर्‍यांसमोर चालू वर्षी दर घसरणीमुळे उत्पादन खर्च भागविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.