Mon, May 27, 2019 09:11होमपेज › Solapur › अटलजी माफ करा, तुमच्या प्रेमापेक्षा आमच्यातील वैर मोठे

अटलजी माफ करा, तुमच्या प्रेमापेक्षा आमच्यातील वैर मोठे

Published On: Aug 28 2018 1:46AM | Last Updated: Aug 27 2018 10:12PMमहापालिकेतून : दीपक होमकर 

सोलापूर महानगरपालिकेत भाजपला बहुमत असले तरी त्यांच्यातच असलेल्या दोन गटांतील हितशत्रूत्वाची भावना इतक्या पराकोटीची आहे की त्यांना विरोधी पक्षनेत्याची गरजच नाही. त्यामुळे तेच त्यांचे विरोधक बनले आहेत. अगदी महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या सभेपासून ते महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यापर्यंत, नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासापासून ते विकासकामांसाठी निधी आणण्यापर्यंत हे दोन्ही गट एकमेकांवर इतकी प्रचंड कुरघोडी करतात की, त्यामुळे एकेका कामाला महिनोमहिना विलंब होतो. हे दोन गट म्हणजे अर्थात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील. मात्र आपल्याच पक्षातील दोन गटांतील वैर असावे तरी केवढे याला काही मर्यादा!  ज्यांनी राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटन केले, देशात दोन खासदारांवरून अवघी सत्ता काबीज करेपर्यंत ज्यांनी आपले आयुष्य पक्ष मजबूत करण्यासाठी वेचले त्या सर्वच भाजपवासियांना पितृतुल्य असणार्‍या अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने सारा देश हळहळ व्यक्त करत असताना आम्ही सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी मात्र कुणाची शोकसभा आहे याला महत्त्व न देता कुणी आयोजिली आहे याला जास्त महत्त्व दिले. मग सहकारमंत्र्यांनी ठेवलेल्या शोकसभेला सहकारमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना जाता आले नाही, तर आपण आपली स्वतंत्र शोकसभा ठेवून आपल्याला असलेले दुःख दाखवायलाच हवे यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघापुरती स्वतंत्र शोकसभा ठेवली. त्यावेळी सहकारमंत्र्यांच्या गटातील कार्यकर्ते फिरकलेच नाहीत. 

त्यामुळे आम्हालाच जास्त शोक किती आहे, हे दाखविण्यासाठी अटलजींचा अस्थिकलश सोलापुरात कोण आणणार यासाठी जणू स्पर्धा लागली. अखेर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते अटलजींचा अस्थिकलश सोलापुरात येणार, अशी बातमी  सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागली. त्यामध्ये अटलजींचा अस्थिकलश या शब्दाला दुय्यम महत्त्व देत पालकमंत्र्यांच्या हस्ते याच शब्दाला अधिक अधोरेखित केले गेले. हा अस्थिकलशही भाजप कार्यालयात, चार हुतात्मा पुतळा यासारख्या ठिकाणी दर्शनासाठी न  ठेवता  तो पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयासमोर ठेवण्यात आला. यापाठीमागेही हा शोक पालकमंत्री गटाच्या कार्यकर्त्यांकडून आहे, हेच दाखविण्याचा प्रयत्न ठळकपणे दिसत होता. एकूणच काय तर ज्या महान नेत्यांनी हा पक्ष बांधला, ज्यांच्या निधनाला अगदी राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षांच्या नेत्यांसह गल्लीतल्या छोट्या कार्यकर्त्यांनीही शोक व्यक्‍त केला त्या पितृतुल्य व्यक्तीशी भाजपमधील सख्खे कार्यकर्तेही शोक व्यक्त करताना पक्क्या वैर्‍यांसारखे वागले, यापेक्षा वाईट ते काय असावे.